पिंपळदर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:52 PM2020-02-17T22:52:30+5:302020-02-18T00:23:00+5:30
राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील पिंपळदर गावाजवळील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्किल झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने गटारींची स्वच्छता करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
खामखेडा : राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील पिंपळदर गावाजवळील रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्त्यावरून वाहन चालविणे मोठे मुश्किल झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने गटारींची स्वच्छता करून वाहनधारकांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
साक्री-नामपूर-सटाणा-खामखेडा -बेज-कळवण-नांदुरी-वणी-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक सतरा असून, या मार्गावर सटाणा ते खामखेडा या गावाच्या दरम्यान पिंपळदर या गावाजवळून हा रस्ता जातो. या रस्त्यावरून पूर्वी नाल्याचे पाणी येत असे. पिंपळदर गावाच्या पश्चिमेस व उत्तरेस डोंगर असल्याने पावसाळ्यात या डोंगराचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येत असते. तेव्हा हा रस्ता तयार करताना पावसाळ्यात पावसाचे रस्त्यावर येऊ नये. म्हणून रस्ता तयार करताना पिंपळदर गावाजवळ लाखो रुपये खर्चून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंटच्या गटारी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु देखभालीअभावी त्या गटारीत कचरा आणि माती जाऊन आज पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी पिंपळदर गावाजवळून डांबरी रस्त्यावरून वाहते.
पिंपळदर गावाजवळ डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडली असून, या ठिकाणी डांबरी रस्ता नाही असे वाटते. त्यामुळे रस्त्यावरील बारीक खड्डे पाणी साचून आता मोठे झाले आहेत. परंतु आता पावसाळा संपून तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र अचानक एक महिन्यापासून नाल्याला पाणी आल्यामुळे नाले वाहू लागले आहेत. या पाण्यामुळे वाहनचालकास खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक वेळा खड्ड्यात जाऊन वाहनांचे नुकसान होत आहे. हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर चारचाकी, दुचाकी याची सतत वर्दळ असते. रस्त्यावर चारचाकी व दुचाकी यांच्यात वाहन समोरासमोर पास करताना दोन्ही वाहनधारकांना कसरत करावी लागते.
रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारी माती व कचºयाने तुडुंब भरल्या असून, पाण्याला वाट मिळत नसल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. या रस्त्यालगतच्या गटारी साफ करण्यासाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून निधी मंजुरीची तरतूद नसल्याने संबंधित विभागाने यावर मार्ग काढावा.
- संदीप पवार, सरपंच, पिंपळदर