सिन्नर : पगाराच्या काळात कामगारांना धाक दाखवून त्यांना मारहाण करून लुटणारी टोळी कामगार व नागरिकांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात सिन्नर एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. महिनाभरात रस्तालूट करणारी दुसरी टोळी गजाआड झाली आहे. मुसळगाव-गुरेवाडी रस्त्याने मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मुसळगाव औद्योगिक वसाहतीतून घराकडे जाणाऱ्या दोघा कामगारांची दुचाकी तीन चोरट्यांनी अडविली. त्यांना मारहाण करुन त्यांच्या ताब्यात मोबाइल व रोख रक्कम चोरट्यांनी काढून घेतली. त्यानंतर पुन्हा या चोरट्यांनी दुसऱ्या कामगारांची हिरो होंडा मोटारसायकल (क्र. एम. एच. १७ ए. टी. २४४०) अडवून त्यावरील दोघा कामगारांना मारहाण करीत त्यांनाही लुटले. तोपर्यंत लुटलेल्या पहिल्या दुचाकीस्वार कामगारांनी गुरेवाडी शिवारात जावून नागरिकांना घटनेची माहिती दिली होती. गुरेवाडी येथील पोलीस मित्र व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांच्यासोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर निरीक्षक सपकाळे, हवालदार देवीदास लाड, सुनील जाधव, काकासाहेब निंबाळकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एका बाजूने गुरेवाडी ग्रामस्थ व दुसऱ्या बाजूने एमआयडीसी पोलीस गेले. तोपर्यंत रस्त्याने जाणाऱ्या अन्य कामगारांनी या चोरट्यांचा प्रतिकार करण्यास प्रारंभ केला होता. गुरेवाडी ग्रामस्थ व पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेतले तर अन्य एक चोरटा अंधाराचा फायदा घेत शेतातून पसार झाला. पोलिसांच्या पथकाने संगमनेर व शिर्डी येथे फरार चोरट्याचा शोध घेतला. संगमनेर तालुक्यातल्या आश्वी पोलीस ठाण्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिसरा संशयित चोरटा पोलिसांना ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी नवनाथ चंद्रभान आव्हाड (२१), राहूल भाऊसाहेब आंधळे (२३) दोघे रा. प्रतापपूर, आश्वी (ता. संगमनेर) व सुनील रामदास केदार रा. आश्वी (ता. संगमनेर) या तिघा संशयित रस्तालूट करणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोतीराम वसावे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
कामगारांना लुटणारी टोळी जेरबंद
By admin | Published: December 10, 2015 12:07 AM