सातपूर : सातपूर-अंबड लिंकरोडवरील विद्युत जनित्र व रोहित्राभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने महावितरणने अनिश्चित काळासाठी विद्युत पुरवठा खंडित केला आहे, तर खंडित विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी नेहमीच अशी समस्या उद््भवत असल्याने महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंबड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. तशीच समस्या सातपूर-अंबड लिंकरोडवरील परफेक्ट वजन काट्याजवळील विद्युत रोहित्र आणि जनित्रभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रोहित्रात पावसाचे पाणी शिरल्याने अनर्थ घडू नये किंवा दुर्घटना घडू नये म्हणून महावितरणने सुरक्षेचा उपाय म्हणून तत्काळ विद्युतपुरवठा खंडित केला आहे. परंतु खंडित विद्युत पुरवठ्यामुळे तेथील ग्राहक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे, तर या व्यावसायिकांकडे काम करणाºया कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत कामगारांना सुटी देण्यात आली आहे. जमिनीलगत असलेले रोहित्र जमिनीपासून थोड्या उंचीवर हलविल्यास ही समस्या निकाली निघू शकते. याबाबत महावितरणने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी गलाराम चौधरी, बाबू नागरगोजे, रणजित सिंग, चुंडावत, एजाज खान आदींनी केली आहे.रोहित्रात पावसाचे पाणी घुसल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाऊस बंद झाल्यानंतर त्यातील पाणी निघाल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. रोहित्राभोवती खड्डा झाला असून, मनपाने हा खड्डा बुजविणे गरजेचे आहे. तेथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. महावितरणकडूनदेखील पाठपुरावा केला जाईल.- मिलिंद वानखेडे, सहायक अभियंता, महावितरण
रोहित्र पाण्याखाली; सातपूर-अंबड लिंकरोड अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:23 AM