त्र्यंबकेश्वर : हरिद्वार येथे भरणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमधील साधू-महंत रवाना झाले आहेत. येत्या ११ मार्चला हरिद्वारला पहिले शाही स्नान होणार आहे. त्या पार्श्वभुूमीवर आखाड्यांच्या पेशवाई मिरवणुका पार पडल्या आहेत.हरिद्वार येथील कुंभमेळ्यासाठी भारतातील ठिकठिकाणचे साधू-महंत रवाना झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथीलही आखाड्यांच्या साधू-महंत यांनी कुंभमेळ्याला हजेरी लावली आहे. विविध आखाड्यांचे साधु-महंत आपापल्या आखाड्यात प्रवेश करताना एकत्र येऊन पेशवाई मिरवणूक काढतात. त्यानुसार त्र्यंबकेश्वर येथील स्वामी सागरानंद आश्रमातील आनंद आखाड्याची पेशवाई मिरवणूक शुक्रवारी (दि.५) शाही थाटात पार पडली.
यावेळी महामंडलेश्वर स्वामी बालकानंद सरस्वती, अखाड्याचे सचिव तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, श्रीमहंत गणेशानंद सरस्वती, आनंद आखाड्याचे श्रीमहंत गिरजानंद सरस्वती आदी मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्याच शाही थाटात महाशिवरात्रीच्या दिवशी पहिले शाही स्नानासाठी मिरवणुक काढण्यात येणार आहे. यावेळी जुन्या भैरव अखाड्याचे प्रथम शाही स्नान होईल. त्यांच्या बरोबर आवाहन अग्नी आखाडे शाही स्नान करतील.
त्यानंतर निरंजनी आनंद, महानिर्वाणी व अटल आखाड्याचे महंत शाही स्नान करतील. दुसरे व मुख्य शाही स्नान १२ एप्रिल रोजी तर तिसरे शाही स्नान १४ एप्रिल, चौथे शाही स्नान २७ एप्रिल रोजी होणार आहे.