नाशिक : महराष्ट्र-गुजरातचा सीमावर्ती भाग असलेल्या नाशिक पुर्व वनविभागाच्या उंबरठाण वनपरिक्षेत्रातून जाणाऱ्या चोरट्यामार्गे गुजरातच्या लाकूड तस्करांकडून चक्क एका राखाडी रंगाच्या इनोव्हा कारमधून सागाची चोरटी वाहतुक केली जात होती. वन गस्तीपथकाला माहिती मिळताच पथकाने सापळा रचून तस्करीचा डाव उधळून लावला.नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसुल, सुरगाणा, उंबरठाण, बाऱ्हे या वनपरिक्षेत्रांची हद्द अत्यंत संवेदनशील आहे. या भागातील साग, खैरासारख्या मौल्यवान वृक्षसंपदेवर सातत्याने गुजरातस्थित तस्करांकडून इलेक्ट्रीक करवत काही स्थानिकांच्या मदतीने चालविली जाते. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील म्हैसखडक या गावाच्या शिवारातून चक्क एका इनोव्हामध्ये सागाचे मोठे लाकूड टाकून तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांना मिळाली. त्यांनी पथकाला सोबत घेत सापळा रचून इनोव्हा (जी.जे१५ सीबी६५१९) कार शिताफीने रोखली. यावेळी तस्करांना वनगस्तीपथकाची कुणकुण लागल्याने जंगलाचा फायदा घेत त्यांनी मोटार उभी करुन पळ काढला.या वाहनाच्या मागावर सुरगाणा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे पथकदेखील होते; मात्र उंबरठाण वन गस्ती पथकाने बाफळून गावाजवळ संशयित राखाडी रंगाची इनोव्हा कार रोखण्यास यश मिळविले. पथकाने कारची झडती घेतली असता मागील बाजूने सीट खाली करुन घेत सागाचा मोठा बुंधा टाकलेला आढळून आला. वनविभागाच्या पथकाने कार सागासह जप्त करुन तत्काळ वणी येथील वनविभागाच्या आगारात हलविली.
गुजरातच्या लाकूड तस्करांकडून आलिशान 'इनोव्हा'मधून सागाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2021 5:01 PM
पथकाने कारची झडती घेतली असता मागील बाजूने सीट खाली करुन घेत सागाचा मोठा बुंधा टाकलेला आढळून आला.
ठळक मुद्देउंबरठाण वनपरिक्षेत्र गस्तीपथकाने तस्करीचा डाव उधळलाउंबरठाण वन पथक गुजरातमध्ये