पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अज्ञात चोरट्यांनी साईबाबा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे वीसहजार रूपयांची रोकड लंपास केली. तसेच ग्रामदैवत श्री संत हरीबाबा मंदिरातीलही दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामुळे पांगरी परिसरात खळबळ उडाली आहे.शनिवार (दि.८) रोजी रात्रीच्या सुमारास येथील साईबाबा मंदिरातील दाराचा कोयंड्याचे स्क्रू खोलून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील दानपेटीचे कुलूप तोडून सुमारे वीस हजार रूपयांची रोकड घेऊन मंदिराच्या दाराच्या कोंडयाचे स्क्रू पुन्हा लावून देत तेथून पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी येथून जवळच असलेल्या श्री संत हरीबाबा मंदिराकडे मोर्चा वळविला. या मंदिराचे शटर्सचे कुलूप तोडून कट्टरच्या सहाय्याने दानपेटीचे कुलूप कापण्याचा प्रयत्न केला. परंतु मंदिरासमोरील रस्त्यावर असलेल्या हॉटेल चालकांच्या चोर चोरी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी तेथून पोबारा केला. पहाटेच्या वेळी साईबाबा मंदिरात आरतीसाठी आलेले बजरंग धुमाळ, श्याम बैरागी, शांताराम वारूळे यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. रविवारी सकाळी याबाबत वारूळे यांनी वावी पोलीसांना चोरी झाल्याची माहिती कळविली. त्यानंतर पोलीस हवालदार संदीप शिंदे व दशरथ मोरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
पांगरी येथे साईबाबा मंदिरात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 5:37 PM