सायने शिवारात बंदूकीचा धाक दाखवून २० लाखाची लुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:54 AM2020-12-07T00:54:08+5:302020-12-07T00:55:08+5:30
मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावरील सायने बु।। शिवारात अज्ञात तीण जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत व बंदुकीचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यांकडून सुमारे २० लाख रूपये लुटले असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
मालेगाव मध्य : तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावरील सायने बु।। शिवारात अज्ञात तीण जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करीत व बंदुकीचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्यांकडून सुमारे २० लाख रूपये लुटले असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
सुनील श्रावण चौधरी रा. लोंढे, ता. चाळीसगाव यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथील कापूस व्यापारी व त्यांचे साथीदार २० लाख ६ हजार २०० रूपये रोख रक्कम बॅगेत घेवून दुचाकी क्रमांक एमएच १९ सीए ४५०६ ने मालेगावकडून लोंढे येथे जात असताना सायने बु।। शिवारातील शेख मोहंमद आरीफ यांच्या शेताजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तीन इसमांनी सुनील चौधरींच्या हातावर व डोक्यावर लाकडी दांडक्याने मारले. त्यामुळे चौधरी व साथीदार दुचाकीवरुन खाली पडले. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हातातील २० लाखाची रक्कम असलेली बॅग घेवून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक डी. के. ढुमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत वरिष्ठांना माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, समीरसिंह साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वेळीच धाव घेतली. मागील काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याने गुन्हेगारांकडून पोलिसांना नवनवीन आव्हान तर दिले जात नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. संशयितांच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहे.