---------------------
मोह शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी शिवारातील सर्व्हिस रोडवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील श्रावण गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. अंदाजे ४० ते ४५ वय असणारी सदर व्यक्ती मनोरुग्ण भिकारी असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शरीराने सडपातळ, रंगाने निमगोरी, चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे व सफेद, दाढीचे केस वाढलेले, उंची १६५ सें.मि., गळ्यात तीन पदरी धागा अशा वर्णनाची व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली आहे. सदर वर्णनाच्या व्यक्तीची ओळख असल्यास एमआयडीसी पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------------
सिन्नरच्या काळेमळ्यातून दुचाकीची चोरी
सिन्नर : येथील काळेमळ्यातून अज्ञात चोरट्यांनी बजाज पल्सर दुचाकी (एच.एच. १७ बी.जे. ७८६७) चोरून नेल्याची घटना घडली. अमोल तुकाराम भोसले (२५) या युवकाने त्याच्या मालकीची दुचाकी काळेमळ्यात घरासमोर लावली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकी चोरून नेली. सकाळी सदर प्रकार निदर्शनास आला. या प्रकरणी मालकाने फिर्याद दिल्यानंतर सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रामदास धुमाळ करीत आहेत.
-----------------------
पांढुर्ली, साकूर उपकेंद्रांना स्वतंत्र वीजवाहिनी
सिन्नर : पांढुर्ली व साकूर उपकेंद्रांना स्वतंत्र वीजवाहिनी जोडण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या वीज वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिल्या. खापराळे येथील १३२ केव्ही केंद्रावरून पांढुर्ली व साकूर उपकेंद्राच्या ३३ केव्ही वाहिनी टाकण्यात येणार आहेत. यामुळे या परिसरातील विजेच्या समस्या दूर होणार आहेत.