सायखेडा : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे दि. २२ मार्चपासून राज्यात जिल्हा परिषदेतील सदस्यांच्या मासिक सभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातात, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत असल्याने या सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी चांदोरी गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी निफाडचे आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.
कोरोना रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विविध सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांच्या सभा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात असे निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र राज्यातील जवळपास अनेक ठिकाणचे निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामकाजही कार्यालयातूनच होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या मासिक सभेला सभागृहातच परवानगी मिळावी. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक सदस्यांची कामे प्रलंबित आहेत. शिवाय सदस्यांना या परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्ग समोर नसल्याने समस्या आणि प्रश्न मांडता येत नाहीत. ऑनलाइन सभेत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक प्रश्न रखडलेले आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात सभेला परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
===Photopath===
031220\03nsk_7_03122020_13.jpg
===Caption===
जिल्हा परिषदेची सभा सभागृहात होण्यासाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देताना चांदोरी गटाचे सदस्य सिद्धार्थ वनारसे. समवेत आमदार दिलीप बनकर.०३ सायखेडा २