नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोसेना-भाजप या प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी वाटपावरून शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेला गोंधळ व त्यातून झालेली बंडखोरी, तीन आजी व तीन माजी अशा सहा नगरसेवकांमध्ये समोरासमोर होणाऱ्या लढतीमुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये ‘जो जिता वही सिकंदर’ ठरणार आहे. सिडकोतील प्रभाग २८ मध्ये सेनेचे वर्चस्व असल्यामुळे सुरुवातीपासूनच सेनेकडून व भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे रस्सीखेच होऊन एकमेकांचा पत्ता कापण्यासाठी राजकीय कुरघोड्या करण्यात आल्या. सेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांना पक्षाने २७ प्रभागातून उमेदवारी दिली असली तरी, त्यांची पत्नी अरुणा यांनी मात्र सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रभाग २८ मध्ये बंडखोरी केली आहे. प्रभाग २८ ‘अ’ नागरिकांचा मागासवर्ग या गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भाजपाकडून माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, माकपाचे गोपाल बडगुजर, कॉँग्रेसकडून अजित गोवर्धने, मनसेचे गणेश मोरे तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून नवनाथ शिंदे, अपक्ष विशाल शंकर मटाले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सेना विरुद्ध भाजपा व मनसे अशी ही लढत दिसत असली तरी, अन्य उमेदवारांकडून कोणाची मते खेचली जातात यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. अपक्ष विशाल मटाले यांच्या मातोश्री कमल मटाले यांनी काही दिवसांपूर्वीच सेनेत प्रवेश केला होता, परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने सेनेवर त्यांची नाराजी आहे. ‘ब’ या सर्वसाधारण महिला गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक शीतल संजय भामरे, भाजपाकडून माजी नगरसेवक प्रतिभा बाळासाहेब पवार, मनसेच्या अनिता बाजीराव दातीर अशी तिघांमध्येच लढत होणार आहे. सेनेच्या शीतल भामरे या गेल्या निवडणुकीत मनसेकडून निवडून आल्या होत्या. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे तर प्रतिभा पवार या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून यापूर्वी विजयी झाल्या असून, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेचा विचार करता, मतदार कोणाला स्वीकारतात हे महत्त्वाचे आहे. ‘क’ सर्वसाधारण महिला गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक सुवर्णा दीपक मटाले, भाजपाकडून अर्पणा गाजरे, राष्ट्रवादीकडून संगीता कैलास सानप, मनसेच्या लताबाई देवराम आगळे व अपक्ष म्हणून माजी नगरसेवक दिलीप दातीर यांची पत्नी अरुणा दातीर यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सेना विरुद्ध भाजप व बंडखोर अशी लढत होणार असून, दातीर यांच्यामुळे रंगत वाढली आहे. सेनेच्या सुवर्णा मटाले या गत निवडणुकीत मनसेकडून निवडून आल्या होत्या व निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. ‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून सेनेकडून दीपक निवृत्ती दातीर, भाजपाकडून याग्निक नंदलाल शिंदे, मनसेकडून माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले, कॉँग्रेसचे किरण बिडलान, माकपाचे प्रा. डॉ. मिलिंद वाघ व अपक्ष प्रकाश चव्हाण यांच्यात लढत होत आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले हे एकदा सेनेकडून निवडून आले आहेत, तर त्यांचे बंधू अनिल मटाले हे सध्या मनसेचे नगरसेवक व प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी करीत आहेत.
जो जिता वही सिकंदर !
By admin | Published: February 17, 2017 12:06 AM