नाशिक - मालीहून भारतात दाखल झालेल्या एका नागरिकाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर त्याच्या ओमायक्रॉन विषाणूच्या चाचणीसाठी नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयेागशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अंबड येथील ज्या हॉटेलमध्ये संबंधित नागरीक उतरला, त्यातील १२ कर्मचाऱ्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आफ्रिकन देशातून येणाऱ्या नागरिकांमधून येणाऱ्या ओमायक्रॉनच्या भीतीने चाचणी करण्यात येत आहे. मात्र, केंद्र शासनाने घोषित केलेल्या १३ धोकादायक देशातील नसल्यानेच माली येथील तीन नागरिकांची विमानतळावर चाचणी न होताच ते नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्वत: केेलेल्या चाचणीत ४९ वर्षाचा एक जण काेरोनाबाधित आढळला. त्यामुळे महापालिकेचीही धावपळ उडाली. संबंधिताला नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात विशेष कक्षात १४ दिवसाकरिता दाखल करण्यात आले असून, त्याचे नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत पुणे येथील प्रयेागशाळेत पाठविण्यात आले आहेत. संबंधित नागरिक अंबड येथील ज्या हॉटेलमध्ये हे तीन विदेशी नागरिक वास्तव्यास होते, तेथील १२ कर्मचाऱ्यांची कोराेना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना एक दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते. तर विदेशातील आणखी दोन नागरिक कोरोना चाचणीत निगेटिव्ह आले आहेत.
इन्फो...
नाशिकमध्ये आतापर्यंत ८८३ नागरिक विदेशातून नाशिकमध्ये आले. त्यातील ३३० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात केवळ एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.