नाशिक - नाशिक जिल्ह्यातील दोन शिवसेना आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिकमध्ये आज रात्री येणार असून ते तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी राष्ट्रवादीच्या बैठकीत संवाद साधणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये नाशिकमधून माजी कृषी मंत्री आमदार दादा भुसे आणि आमदार सुहास कायंदे हे दोघे सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात हे दोनच शिवसेनेचे आमदार आहेत. या घटनेनंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता असून डॅमेज कंट्रोल करून पक्ष एकसंघ राखण्यासाठी संजय राऊत नाशिकमध्ये येणार आहेत. कार्यकर्त्यांशी ते व्यक्तिगत चर्चा करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, माजी पालकमंत्री छगन भुजबळ हेदेखील नाशिकमध्ये दाखल झाले असून शनिवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलावली आहे त्यात ते संवाद साधणार आहेत.