संस्कृत विषयातील किचकटपणा झाला दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:10 AM2017-07-26T00:10:17+5:302017-07-26T00:10:35+5:30

नाशिक : या शैक्षणिक वर्षात आठवी, नववीचा अभ्यासक्रम बदलला असून, त्यातील किचकटपणा दूर करून तो बहुआयामी व हसतखेळत शिकता येऊ शकेल, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे.

sansakarta-vaisayaataila-kaicakatapanaa-jhaalaa-dauura | संस्कृत विषयातील किचकटपणा झाला दूर

संस्कृत विषयातील किचकटपणा झाला दूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : या शैक्षणिक वर्षात आठवी, नववीचा अभ्यासक्रम बदलला असून, त्यातील किचकटपणा दूर करून तो बहुआयामी व हसतखेळत शिकता येऊ शकेल, अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आली आहे.  आजवर संस्कृतच्या पुस्तकातील क्रमिक धड्यांमध्ये संस्कृत नाटक, ग्रंथ यातील उतारे असायचे. त्यावरच भाषांतर करा, समानार्थी शब्द सांगा, विरुद्धार्थी शब्द सांगा असे प्रश्न असायचे. आता संस्कृतच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार संस्कृतच्या पुस्तकात संस्कृतमधूनच धडे व त्यांच्यावर आधारित प्रश्नोत्तरेही संस्कृतमध्येच दिलेली आहेत.  संस्कृत महाकाव्यातील एखादा तुकडा, उतारा, नाटकातील एखादा प्रसंग, कादंबरीतील एखादा भाग याबरोबरच पर्यावरण, चालू घडामोडी यांचाही समावेश करण्यात आला आहे. बदललेल्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात साहित्य, वेद, परंपरा यांबरोबरच विज्ञान, अंधश्रद्धा, मनोरंजन जगत यांच्यावरील प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे.
संस्कृतच्या विद्यार्थ्यांना संस्कृतमधूनच बोलता यावे, संस्कृतचे प्रश्न संस्कृतमधूनच सोडवता यावे, या उद्देशाने संस्कृतच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. संस्कृत शिक्षकांना संस्कृतचे अध्यापन याच विषयामधून करता यावे, संस्कृत उच्चार संस्कृत भाषेतूनच करता यावेत यावरही यात भर देण्यात आला आहे. आजवर इतर भाषांतून शिकवले जाणारे संस्कृत आता शुद्ध संस्कृतमधूनच शिकले गेले पाहिजे, संस्कृतमधून आत्मविश्वासपूर्वक संवाद साधता येईल इतपत विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे हे आता नवीन अभ्यासक्रमानुसार शक्य होणार आहे.
असे आहे नववीच्या पुस्तकाचे स्वरूप
बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नववीच्या पुस्तकात संस्कृतमधून प्रार्थना, प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, १ ते १०० संख्यांचा तक्ता, दैनंदिन वापराच्या वस्तूंची चित्रे व त्यांचे संस्कृतमधील नाव, अकबर-बिरबलाची गोष्ट, वाक्य कसे बनवायचे, जोडशब्द कसे बनवायचे, अवयवमाला, मोबाइलचे फायदे व तोटे सांगणारी आधुनिक युवतीची गोष्ट, शिक्षक व विद्यार्थ्यांचा संवाद सांगणारी गोष्ट, संस्कृतमधून घड्याळाचे वाचन, सकाळ, दुपार व सायंकाळची प्रार्थना, राणीची गोष्ट, नाटक, श्यामची आई पुस्तकातील गोष्ट, काव्यशास्त्र विनोद, युवकाचे दिवास्वप्न सांगणारी छोटी गोष्ट आदींचा समावेश असून, संस्कृत विषय किचकट न वाटता आवडीचा, सोपा वाटेल अशा प्रकारे पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.
संस्कृत विषयाचा अभ्यास आता संस्कृतमधून करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांआधी संस्कृत विषय संस्कृत शिक्षकांनाच नीट शिकवता आला पाहिजे. त्यांचे संस्कृत उच्चार योग्य असले पाहिजे. आजवर संस्कृत विषय स्कोअरिंगचा विषय आहे. चांगले मार्क्स मिळाले, प्रमाणपत्र मिळाले की संपले असे अनेकांचे धोरण असायचे. आता मात्र संस्कृत भाषा मुखात येईल, तिचा गांभीर्याने अभ्यास करता येईल यावर भर देण्यात आला आहे. संस्कृत विषयाची गोडी लागावी, विद्यार्थ्यांनी शाळेनंतरही संस्कृतचा अभ्यास करावा, हा या मागचा उद्देश आहे.
- डॉ. गजानन आंभोरे, प्रांत, संस्कृत अध्यापक संघ

Web Title: sansakarta-vaisayaataila-kaicakatapanaa-jhaalaa-dauura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.