अजमीर सौंदाणेत ‘सरपंच आपल्या दारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:37 AM2020-12-04T04:37:55+5:302020-12-04T04:37:55+5:30
एकदा निवडणूक जिंकल्यानंतर शक्यतो मतदारांच्या दारात कुणी फिरकत नाही; परंतु या परंपरेला फाटा देत अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील ...
एकदा निवडणूक जिंकल्यानंतर शक्यतो मतदारांच्या दारात कुणी फिरकत नाही; परंतु या परंपरेला फाटा देत अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील लोकनियुक्त सरपंच धनंजय आनंदा पवार यांनी वर्षपूर्तीनिमित्त ‘सरपंच आपल्या दारी’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्यक्ष भेटून व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील तसेच गावकऱ्यांना शौचालयाचे महत्त्व, सरकारी योजनांची माहिती, पाणी बचत, कोरोनापासून बचाव करण्यासाठीच्या सूचना व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाईल. त्याबरोबरच गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांच्या मनात काही संकल्पना असल्यास त्या जाणून घेऊन त्या सूचनांचीही दखल घेण्यात येईल, असेही सरपंच पवार यांनी सांगितले.
अजमीर येथे ९ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदाच झालेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत धनंजय पवार भरघोस मतांनी निवडून आले होते. त्यानंतर निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांप्रमाणे वर्षभरात गावात विविध कामे करण्यात आली. परंतु कोरोना संकटामुळे विकासकामांमध्ये आलेली शिथिलता पुढील काळात भरून काढली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अजमीर सौंदाणे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव असून, तो वारसा जपण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. माझे गाव, हेच माझे कुटुंब आहे आणि त्याप्रमाणेच माझी पुढील वाटचाल राहील.
- धनंजय पवार, सरपंच
===Photopath===
031220\03nsk_4_03122020_13.jpg
===Caption===
अजमीर सौंदाणे येथे वर्षपूर्तीनिमित सरपंच आपल्या दारी अनोखा उपक्रम राबविताना सरपंच धनंजय पवार व ग्रामस्थ.०३ औंदाणे १