सटाणा, नामपूर कृउबाची एप्रिलमध्ये निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:02 PM2018-02-05T16:02:39+5:302018-02-05T16:03:56+5:30
सहकार क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच सटाणा व नामपूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येणार आहे.
नाशिक : सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मुदत संपुष्टात आल्याने सहकार विभागाने तयार केलेली प्रारूप मतदार यादी सोमवारी जाहीर करण्यात आली असून, या यादीवर हरकती व सूचना घेण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याने त्यानंतर साधारणत: ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत असल्याने या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
सहकार क्षेत्राच्या निवडणुकीसाठी सहकार प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन कायद्यानुसार पहिल्यांदाच सटाणा व नामपूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सोसायटी, शेतकरी प्रतिनिधी असे गट कमी करून दहा गुंठे जमीन ताब्यात असलेल्या सर्वांनाच मतदार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मतदारांची संख्याही कमालीची वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी या दोन्ही बाजार समित्यांसाठी गणांची व आरक्षणाची निश्चिती करण्यात आली आहे. राखीव पाच जागांसाठी चिठ्या काढण्यात आल्या आहेत. सहकार कायद्यान्वये जाहीर करण्यात आलेल्या मतदारांच्या प्रारूप मतदार यादीनुसार एक महिना या यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार असून, त्याची सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. सोमवारी जिल्हा निवडणूक शाखेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर साधारणत: ४५ दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे साधारणत: एप्रिलच्या दुसºया आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.