सावता माळी योजना : नाशिकच्या शेतक-यांना आठवडे बाजारासाठी पांजरापोळने दिली मोफत जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:41 PM2017-11-29T15:41:22+5:302017-11-29T15:44:22+5:30
ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल व शेतक-यांना शेतमालाचा योग दर आणि विक्रीसाठी सुयोग्य मोफत जागा मिळणार असल्यामुळे दोघांचा लाभ होणार आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतीमालाचे हाताळणीदरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. शहर व परिसरातील सर्व शेतक-यांसाठी सदर योजना विनामुल्य
नाशिक : शेताच्या बांधावरून थेट नागरिकांच्या पिशवीपर्यंत शेतमाल विक्रीसाठी राज्य कृषी पणन मंडळ व नासिक पंचवटी पांजरापोळ यांनी संयुक्तरित्या पुढाकार घेतला आहे. यामुळे नाशिकमध्ये दर शुक्रवारी मखमलाबाद-हनुमानवाडी लिंकरोडवर असलेल्या पांजरापोळच्या जागेत ‘शेतकरी आठवडे बाजार’ गजबजलेला पहावयास मिळणार आहे. यासाठी शेतक-यांकडून पांजरापोळ संस्था कुठल्याही प्रकारे दर आकारणार नसल्याचे त्यांच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शेतक-यांना त्यांचा शेतमाल बांधावरून थेट नागरिकांपर्यंत कोणत्याही गैरसोयीचा सामना न करता विक्री करता येणार आहे. विविध रिंगरोडलगत लहान शेतकरी आज त्याचा शेतमाल विक्री करण्याचा प्रयत्न करताना दररोज संध्याकाळी दिसून येतो. यावेळी अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळाही निर्माण होतो; परिणामी मनपा अक्रिमण निर्मूलन पथकाकडूून होणा-या कारवाईलाही सामोरे जावे लागते. यामुळे शेतक-यांची गैरसोय होत होेती. कृषी पणन मंडळाने याबाबत पुढाकार घेऊन शेतक-यांसाठी थेट ‘शेतकरी आठवडे बाजार’ भरविण्यासाठी मोफत जागा पांजरापोळ संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्यामुळे जागेचा प्रश्न मार्गी लागला असून येत्या शुक्रवारपासून या बाजाराचा शुभारंभ केला जाणार आहे. दुपारी तीन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी बाजार भरणार आहे. यामुळे नागरिकांना शेतक-यांनी पिकविलेला शेतीमाल वाजवी दरात व दर्जेदार पध्दतीने उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे. ग्राहकांना दर्जेदार शेतीमाल व शेतक-यांना शेतमालाचा योग दर आणि विक्रीसाठी सुयोग्य मोफत जागा मिळणार असल्यामुळे दोघांचा लाभ होणार आहे. तसेच उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे शेतीमालाचे हाताळणीदरम्यान होणारे नुकसानही टळणार आहे. शहर व परिसरातील सर्व शेतक-यांसाठी सदर योजना विनामुल्य असून अधिक माहितीसाठी व नोंदणीकरिता दिंडोरीरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी या बाजारात येताना कापडी पिशव्या खरेदीसाठी आणण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.