शाळा बंदच, मात्र शिक्षण सुरू झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:26+5:302021-06-16T04:19:26+5:30
नाशिक : शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची मंगळवारपासून (दि.१५) सुरुवात झाली असली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
नाशिक : शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची मंगळवारपासून (दि.१५) सुरुवात झाली असली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अजूनही कुलूपच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अशा ५ हजार ६२६ शाळा बंदच असल्या तरी जिल्ह्यातील सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सुरू झाले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील शाळांची घंटा यावर्षी ऑनलाइन पद्धतीनेच वाजली. शहरासह जिल्ह्यातील काही खासगी व स्वयंअर्थसाहाय्य शाळांनी शाळा सुरू करण्याची तयारी केली होती; परंतु शिक्षण विभागाने अजूनही प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेले जमावबंदीचे आदेश अजूनही जिल्ह्यात लागू असल्याने शाळा प्रत्यक्षरीत्या सुरू होऊ शकल्या नाहीत. मात्र, महानगरपालिका क्षेत्रातील मनपाच्या शाळांसह शहर परिसरातील आणि ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. या भागातील खासगी शिक्षण संस्थांनीही विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी गुगल क्लासरूमसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षणही बंद असल्याने विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी उत्सुकता दाखवत ऑनलाइन शाळेच्या क्लासमध्ये सहभागी होऊन तंत्रस्नेही शिक्षणाच्या नव्या प्रवाहाचा अनुभव घेतला.
इन्फो-
दुर्गम भागातील विद्यार्थी वंचित
कोरोनाच्या संकटात मागील वर्षात टाळेबंदी असताना नाशिक जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रवाहात सामाविष्ट झाले होते. मात्र, अतिदुर्गम आदिवासी भागात अजूनही ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
इन्फो
ऑनलाइन शिक्षण पद्धतीत शिक्षण संस्थांकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणत वाढला आहे. शिक्षकांकडून ऑनलाइन तासिका झाल्यानंतर त्याचे व्हिडिओ तसेच गृहपाठ व्हॉट्सॲप, टेलिग्रामसारख्या विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात आहेत. तसेच विद्यार्थीही पूर्ण केलेला गृहपाठ व्हॉट्सॲपद्वारेच शिक्षकांकडून तपासून घेत आहेत. बालभारतीनेही ऑनलाइन शिक्षणासाठी पहिली ते बारावीची पुस्तके पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.