मोरेनगर गावात लष्करी जवानांनी भरवली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 06:01 PM2020-12-29T18:01:22+5:302020-12-29T18:10:47+5:30
सटाणा : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्था ऑनलाइन झाल्याने गोरगरीब तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी पर्याय व्यवस्था नसलेल्या विद्यार्थ्यांना मोरेनगर गावातील सुट्टीवर आलेल्या याच नऊ जवानांनी आपला वेळ स्वतःच्या घरात जिल्हा परिषद शाळा मोरेनगर व परिसरातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी बोलवत ज्ञानार्जन केले.
सटाणा : लष्करी जवान म्हटल्यावर आपल्याला सीमेवर लढणारा जवान डोळ्यासमोर येतो, कारण त्याग,शॉर्य आणि विजय यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भारतीय सैनिक. ऊन,वारा, पाऊस,नैसर्गिक आपत्तींसोबत मैत्री करत आपत्तीच्या काळात डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशसेवा करणाऱ्या जवानांना मिळणारी सुट्टी परिवारासोबत घालवणं हे स्वाभाविक आहे.
मात्र करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शिक्षण व्यवस्था ऑनलाइन झाल्याने गोरगरीब तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी पर्याय व्यवस्था नसलेल्या विद्यार्थ्यांना मोरेनगर गावातील सुट्टीवर आलेल्या याच नऊ जवानांनी आपला वेळ स्वतःच्या घरात जिल्हा परिषद शाळा मोरेनगर व परिसरातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी बोलवत ज्ञानार्जन केले.या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील सुमारे 25 जवान आज देशसेवेत असून सुट्टी वर आलेल्या हेमराज बागुल, पंकज मोरे,देविदास देवरे,यशवंत मोरे ,सुरज मोरे,सतीश मोरे,गिरीष वाघ,तुषार मोरे या जवानांनी स्वयंस्फूर्तीने गावातील प्राथमिक शाळेची संपूर्ण साफसफाई करून विद्यार्थ्यांना दररोज आपला एक तास आपल्या घरी बोलावून अध्यापन सुरु केले.
मोरेनगर गावातील जवानांनी करोना काळात केलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेत बागलाण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने गटशिक्षणाधिकारी टी. के.घोंगडे ,केंद्रप्रमुख एम. एस.भामरे यांनी सर्व जवानांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात या जवानांच्या वतीने विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व खाऊ वाटण्यात आला. या कार्यक्रमात मुख्याध्यापक नारायण सोनवणे,सुरेश बच्छाव,राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री सोपान खैरनार, प्रतिभा अहिरे,वैशाली पवार, व विद्यार्थी सामाजिक अंतर राखत उपस्थित होते.
@जवानांचे गाव अशी ओळख असणाऱ्या मोरेनगर गावातील सुट्टीत आलेल्या जवानांनी आपला वेळ परिवाराच्या सोबत कोरोनामुळे शाळेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत घालून केलेल्या ज्ञानदानाचा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात एक अनोखा व प्रेरणादायी आहे.
सोपान खैरनार, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक