मुखेड : श्रीभवानीमातेच्या पावन पर्वानिमित्त घटस्थापनेसाठी शेततळ्यातून पाणी घेण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा दुर्र्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना येवला तालुक्यातील मुखेड येथे घडली. समाधान गोरख सोनवणे (15) असे मयत मुलाचे नाव आहे.मुखेड -महालखेडा रस्त्यावर श्री भवानी मातेचे मंदिर आहे. परिसरातील शेतकरी ग्रामस्थ या मंदिरात घटस्थापना करण्यासाठी दरवर्षी जातात. त्यानुसार मुसळगाव येथील एमआयडीसीत नोकरीस असलेले गोरख पुजाबा सोनवणे हे मुखेड येथे त्यांच्या शेतात व भवानी माता मंदिरात धार्मिक विधी करण्यासाठी मुलगा समाधानसह गेले होते. दोघेही येथील भवानी मंदिरात घटस्थापना करण्यासाठी गेले असता गोरख सोनवणे मंदिरात पूजेसाठी थांबले होते. तर समाधान पूजेसाठी पाणी आणण्यासाठी मंदिरालगत असणार्या अरु ण पगार यांच्या शेतजमीनतील शेततळ्याकडे गेला होता. सुमारे अर्धा पाऊण तासाचा विलंब होऊनही समाधान येत नसल्यामुळे गोरख सोनवण तळ्याकडे गेले असता तळ्याच्या काठावर समाधानचे सँडल दिसून आले. यामुळे त्यांना पाणी भरून घेताना समाधान पाण्यात पडला असण्याची शंका आली. त्यांनी तत्काळ माजी उपसरपंच रत्नाकर आहेर यांच्याकडे संपर्कसाधून मदतीची मागणी केल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणार्या नवनाथ भवर या युवकास तळ्यात उतरवण्यात आल्यानंतर समाधानला बाहेर काढले. परंतु तोपर्यंत दुर्दैवाने समाधानचा मृत्यू झाला होता. समाधान हा गोरख सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा होता. याप्रसंगी माजी सरपंच अनंता आहेर, पोलीसपाटील सुरेश वाघ, अरु ण आहेर, महेश अनर्थे, विनायक आहेर आदींसह ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. पोलीस हवालदार गंभीरे, हेंबाडे, लकडे पुढील तपास करीत आहते.
शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 8:56 PM