‘त्या’ बाधिताच्या घराजवळील परिसर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 02:08 AM2020-04-28T02:08:02+5:302020-04-28T02:08:30+5:30
शहरातील म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील एक युवक कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने त्या बाधिताच्या घरापासूनचा शंभर मीटर भाग सील केला आहे. या बाधिताच्या संपर्कातील पाच जणांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधितासह पाच जणांचे घशातील स्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
नाशिक : शहरातील म्हसरूळ परिसरातील किशोर सूर्यवंशी मार्गावरील एक युवक कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर महापालिकेने त्या बाधिताच्या घरापासूनचा शंभर मीटर भाग सील केला आहे. या बाधिताच्या संपर्कातील पाच जणांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाधितासह पाच जणांचे घशातील स्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
शहरात यापूर्वी दहा बाधित रुग्ण आढळले होते. त्यातील गोविंदनगर येथील कोरोनाबाधित पूर्णत: बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. आणखी दोन बाधितांचे आता तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत असताना आता म्हसरूळ येथे आणखी एका बाधितामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी (दि.२६) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. सदरचा बाधित हा मूळचा सुरगाणा तालुक्यातील असला तरी सध्या तो म्हसरूळ परिसरात वास्तव्यास होता. मात्र, असे असले तरी फक्त रात्रीच तो घरी जात असे आणि दिवसभर त्याच्या कामकाजासाठी बाहेर असल्याने परिसरात जवळपास संपर्क नव्हताच. तरीही महापालिकेने जोखीम न पत्कारता सोमवारी (दि.२७) त्याठिकाणी शंभर मीटर परिसराचा भाग सील केला आहे. तसेच या भागातील रहिवाशांची तपासणी सुरू केली आहे.
बाधितांची संख्या पोहोचली दहावर
बाधित रुग्णाच्या अति निकटच्या संपर्कातील पाच नागरिकांना डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. शहरात या एका रुग्णामुळे बाधितांची संख्या १० झाली आहे.
४यापूर्वी गोविंदनगर, धोंडगे मळा, आनंदवली, बजरंगवाडी (समाज कल्याण विभागाचे वसतिगृह), संजीवनगर याठिकाणचे रुग्ण दाखल आहेत. मानखुर्दवरून नाशिक शहरातून जाणाऱ्या एका सुरक्षा कर्मचाºयालादेखील लागण झाली आहे.
अमर्याद
कालावधीसाठी सील
म्हसरूळ जवळील किशोर सूर्यवंशी मार्ग येथे आढळलेल्या नव्या कोरोनाबाधित युवकामुळे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढील आदेश देईपर्यंत हा परिसर सील केल्याचे नमूद केले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रातील कोणीही व्यक्ती घर सोडून या क्षेत्राबाहेर जाऊ शकणार नाही किंवा बाहेरील व्यक्ती या क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाही. या आदेशाचा भंग केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.
४दुपारनंतर म्हसरूळ परिसरातील अंतर्गत रस्ते बंद करण्यास प्रारंभ करण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना विनंती करीत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला.