मालेगाव मध्य : शहरातील फार्मसी कॉलेजसमोर सराईत गुन्हेगार मोहम्मद तालीब ऊर्फ तालीब नाट्या याचा धारदार शस्राने भोसकून व गळा चिरून हत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आले. मागील दहा दिवसांत शहरातील पूर्व भागात दोन सराईत गुन्हेगारांच्या धारदार शस्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.याप्रकरणी मयताचा भाऊ मोहम्मद राशीद मोहम्मद हनिफ रा. गोल्डननगर याने पवारवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयावरून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी दिली.शहरातील नियामत बाग येथील मोती हायस्कूलजवळ व मनपा उर्दू शाळा क्रमांक २८ समोर शुक्रवारी सकाळी ७ वाजेपूर्वी तीन जणांनी संगनमताने अज्ञात कारणाने धारदार शस्राने तालीब नाट्याच्या छातीवर, पोटात, दंडावर भोसकून व गळा चिरून हत्या केली. सकाळी साडेसात वाजता हत्येचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवले, पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शकील शेख, काळे, उपनिरीक्षक नाझीम शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडीचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मोहंमद जाबीर एकलाख अहमद उर्फ ओसामा (आतंक), सलमान खलील अहमद ऊर्फ तारो व अख्तर अली हम्माद आझम मोमीन उर्फ नेपाली या तिघांना ताब्यात घेतले. मोबाईल व पैसे चोरल्याच्या कारणावरून सदर हत्या केल्याची कबूली या तिघांनी दिली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख करीत आहे.मयत मोहम्मद तालीब मोहम्मद हनिफ ऊर्फ तालीब नाट्या हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर शहरातील आझादनगर, आयेशानगर व पवारवाडी पोलीस ठाण्यात एकूण ११ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यापैकी आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अवघ्या नऊ दिवसांपूर्वीच (२७ मे ) त्याची जामिनावर सुटका झाली होती. यापूर्वी पवारवाडी पोलिसांनी त्यास हद्दपार केले होते.४दहा दिवसांत खुनाची दुसरी घटना मालेगावी गेल्या महिन्यात २७ मे रोजी म्हाळदे शिवारात कौटुंबिक कारणावरून शाहिद अहमद मोहमद सलिम ऊर्फ राजू बागडू याचा गळा चिरून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्यानंतर दहाच दिवसात पुन्हा खुनाची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
मालेगावी दहा दिवसात दुसरी घटना : तीन अटकेत, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:06 PM