नाशिकमध्ये अडीच हजार अनियमित बांधकामांना दुसऱ्यांदा नोटिसा
By श्याम बागुल | Published: May 11, 2023 03:45 PM2023-05-11T15:45:51+5:302023-05-11T15:46:13+5:30
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे पावले पडत असून, त्यातूनच शहरातील अनधिकृत बांधकामे शोधण्याची मोहीम जानेवारी महिन्यात हाती घेण्यात आली होती.
नाशिक : मिळकतीच्या वापरात बदल, बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर अनियमित बांधकामे करून वापरात बदल केलेल्या सुमारे अडीच हजार मिळकतधारकांना महापालिकेच्या नगररचना विभागाने दुसऱ्यांदा नोटिसा बजावल्या असून, मिळकतधारकांनी सदर बांधकामे नियमित न केल्यास अतिक्रमण विभागाकडून ही अतिक्रमणे उद्ध्वस्त करण्यात येणार असल्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आल्याने मिळकतधारकांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे पावले पडत असून, त्यातूनच शहरातील अनधिकृत बांधकामे शोधण्याची मोहीम जानेवारी महिन्यात हाती घेण्यात आली होती. सहाही विभागांतील ३१ प्रभागांमध्ये त्यासाठी विशेष पथके गठीत करून अनधिकृत बांधकामे शोधण्यात आली. त्यात बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर अतिरिक्त बांधकामे करणे, बांधकामाचा दाखला न मिळताच इमारतीचा वापर करणे, रहिवासी मिळकतीचा वाणिज्य वापर करणे, अनधिकृत बांधकामे करणे अशा प्रकारचे सुमारे अडीच हजार प्रकरणे समोर आली होती.
मिळकतधारकांना नगररचना विभागाने पहिली नोटीस बजावून बांधकामासंदर्भातील परवान्याची सर्व कागदपत्रे हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही मिळकतधारकांनी आपली कागदपत्रे सादर केली. त्याची तपासणी व चौकशी केली जात असून, त्यातील काहींनी दंड भरून मिळकती नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि, अद्यापही अनेक मिळकतधारकांनी नगररचना विभागाच्या नोटिसांकडे पाठ फिरविल्याचे लक्षात आल्यावर नगररचना विभागाने पुन्हा दुसऱ्यांदा नोटिसा बजावून अंतिम सूचना दिली आहे.