नाशिक : एकीकडे स्त्री जन्माचे स्वागतासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न होत असून नुकताच जागतिक महिला दिन साजरा करून नारीशक्तीचा सर्वत्र गौरव करण्यात आला; मात्र शहरात त्याच दिवशी फाळकेस्मारक परिसरात स्त्री जातीचे नवजात शिशु आढळून आले होते. या घटनेला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा शनिवारी (दि.९) भारतनगर भागात पटांगणात आढळून आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरी भागात नागरिकांच्या संवेदना मृत्यूमुखी झाल्याचा प्रत्यय आणून देणाऱ्या या घटना लागोपाठ घडल्याने समाजाच्या वैचारिक स्तराबाबत चिंता व्यक्त होत आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतनगरजवळील घरकुल प्रकल्पाशेजारी असलेल्या नंदीनीच्या काठावरील मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले.ज्या जीवाला नऊ महिने आपल्या गर्भात वाढविले त्याला जन्म देऊन असे उघड्यावर टाकून फरार होणाऱ्या निर्दयी जन्मदात्री महिलांविषयी तीव्र संतापाची भावना समाजातून व्यक्त होत आहे. मातृत्वाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या कलियुगात अशा काही घटना सभोवताली घडत आहेत. आपल्या स्वार्थापोटी मनुष्यप्राणी कुठल्या स्तरावर जाऊन माणुसकीला काळीमा फासणारे वर्तन क रू शकतो, याचाच प्रत्यय या घटनांमधून समाजाला वारंवार येत आहे. यावरून समाज अद्यापही परिपक्व झाला नसल्याचे अधोरेखित होते.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, ‘मुलगी शिकली प्रगती झाली’, ‘मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी वंशाची पणती’ अशा विविध समाजप्रबोधनपर घोषवाक्यांच्या माध्यमातून स्त्री भ्रूण हत्त्यापासून मुलीच्या संवर्धन-संरक्षणाचा जागर केला जातो. तरीदेखील समाजाती मानसिकता बदलत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसांत घडलेल्या या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे नवजात शिशू हे स्त्री जातीचे असल्याचे पोलिसांना आढळून आले. नवजात शिशुला जन्मास घालून बेवारस सोडून पळ काढणा-या अज्ञात स्त्रीविरूध्द पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे नवजात शिशू मयतावस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.
दुसरी घटना : नवजात स्त्री जातीच्या शिशूला मैदानात सोडून जन्मदात्री फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 4:36 PM
'नंदीनी'च्या काठावरील मोकळ्या मैदानात अज्ञात महिलेने नुकतेच जन्माला आलेल्या स्त्री जातीच्या नवजात शिशुला रात्रीच्या सुमारास नागरिकांची नजर चुकवून रामभरोसे सोडून पळ काढल्याचे उघडकीस आले.
ठळक मुद्देसमाज अद्यापही परिपक्व झाला नसल्याचे अधोरेखितअज्ञात स्त्रीविरूध्द पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात आला