देवळ्यात दुय्यम निबंधकाचा पुन्हा खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 09:50 PM2021-02-18T21:50:24+5:302021-02-19T01:43:38+5:30
देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
देवळा : येथील मुद्रांक घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांच्याकडून पदभार काढून घेत माधव महाले यांच्याकडे सोपविला होता. आता महाले यांच्याऐवजी स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी तातडीने कारवाई करत तीन सदस्यांचे चौकशी पथक नेमून त्यांना देवळा येथे पाठवले होते. तपास सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांनी देवळा येथील तत्कालीन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांचा पदभार काढून घेण्याची कार्यवाही करून माधव महाले यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा पदभार सोपविण्यात आला होता. दवंगे यांनी महाले यांना सदर प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. शासनाच्या वतीने महाले यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेत स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तालुक्यात बनावट मुद्रांक व मुद्रांकावर छेडछाड करून जमीन खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे यापूर्वी लाखो रुपयांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केलेल्या जनतेच्या मनात साशंकता निर्माण झाली असून मुद्रांक घोटाळा प्रकरणाचा लवकर पर्दाफाश करून यातील सत्य समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुद्रांक विक्रेत्यांची संख्या अपुरी
देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर सात व्यक्तींना मुद्रांक विक्रीचे परवाने देण्यात आले होते. तालुक्याचा विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता मुद्रांक विक्रेत्यांची ही संख्या अपुरी होती. दोन महिन्यांपूर्वी मुद्रांक विक्रेता रमाकांत वाघमारे यांचे निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त झाली आहे. देवळा येथील मुद्रांक घोटाळा प्रकरणात एक मुद्रांक विक्रेता अडकलेला असल्यामुळे त्याचे कामकाज सध्या बंद आहे. सध्या देवळा येथील जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात अवघे चार मुद्रांक विक्रेते नागरिकांना सेवा देत आहेत. येथे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता मुद्रांक विक्रेत्यांची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नवीन मुद्रांक विक्रेत्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.