पिंपळगाव बाजारपेठेला मंदीचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:18 PM2018-12-15T17:18:27+5:302018-12-15T17:18:42+5:30
शेतमाल दरात घसरण : छोटे व्यावसायिकही संकटात
पिंपळगाव बसवंत : आशिया खंडातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असा नावलौकीक मिळवणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरातील बाजारपेठेवरही शेतमाल दरात होणा-या घसरणीचा परिणाम दिसून येऊ लागला असून सद्यस्थितीत बाजारपेठेला मंदीचा वेढा पडल्याने छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठेची उलाढाल शेतीमालावर अवलंबून आहे.शेतीमालाचे दर तेजीत असतील तर बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी असते.मात्र, टोमॅटो,कांदा यासह इतर शेतीमालाचे दर कोसळल्याने पिंपळगावतील बाजारपेठेला मंदीचा वेढा पडला आहे. कोटींची उलाढाली होणा-या पिंपळगाव शहरात व्यावसायिकांची बोहोनी होणे अवघड होऊन बसले आहे. पिंपळगाव बसवंतला कांद्यासाठी आशिया खंडातील नामवंत व शंभर एकरवर पसरलेली सगळ्यात मोठी बाजारसमिती असल्याने शहराला श्रीमंताची झालर आहे. येथील बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. मात्र शेतीमालाच्या कोसळलेल्या दराने बाजारपेठेलाही ग्रहण लागल्याचे सध्याचे चित्र आहे. शेतमालाचे सातत्याने दर कोसळत असल्याने व्यावसायिक महिनाभरापासून चिंतेत आहेत.
कोट्यवधीची उलाढाल ठप्प
सोने,दुचाकी,चारचाकी,कृषी केंद्र,बांधकाम उपयोगी साहित्य,कापड विक्र ी, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह इतर खरेदी विक्र ी करणारा मोठा व्यापारी व व्यवसायिक वर्ग दररोज कोटीची उलाढाल या ठिकाणी करत असतो. परंतु मंदीच्या जाळ्यात सर्वच व्यवसायिक अडकल्याने, होणारी उलाढाल निम्म्यापेक्षा जास्त घटल्याचे चित्र आहे. कांद्याचे सरासरी दर ३०० रु पये प्रति क्विंटल तर टमाट्याने शेतक-यांना हताश केले आहे.