नाशिक : जैन समाजाचा चतुर्मास प्रवेश सोहळा येथील भाविक आराधना भवन येथे रविवारच्या संततधारेत उत्साहात पार पडला. जैन धर्मात आत्म्यात परमात्मा पाहण्याची शिकवण दिली असल्याचे प्रतिपादन मरुधररत्न जैन आचार्य रत्नसेन सुरीश्वर महाराज यांनी याप्रसंगी केले. सुमती सोसायटी कॅनडा कॉर्नर येथून रविवारी सकाळी जैन बांधवांनी मिरवणूक काढली. महावीर सोसायटी, राका कॉलनीमार्गे भाविक आराधना भवन येथे आल्यानंतर चतुर्मास प्रवेश सोहळ्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी आचार्य रत्नसेन सुरीश्वरजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पैसा मानसाला सुखी बनवतो, हा भ्रम सर्वांनी मनातून काढला पाहिजे. घरामध्ये देवदर्शन, गुरुदर्शन यापेक्षा ‘दूरदर्शन’ला महत्त्व आल्याने मानवीमूल्यांची पायमल्ली झाल्याचे त्यांनी सांगितले. जीवनात सुख-दु:खाच्या अनेक प्रसंगांनी मन विचलित होते. अशा वेळी आपला आत्माच आपल्याला मार्गदर्शक ठरतो, असे त्यांनी सांगितले. त्यांचे येथे विविध विषयांवर दैनंदिन प्रवचन होणार आहे. याप्रसंगी प्रवीणचंद शाह, हस्तीमल चोपडा, गौतम सुराणा, अनुज शाह, शैलेश शाह, भूपेंद्र शाह, प्रकाश बोथरा, पृथ्वीराज बोरा, बाबूलाल पटवा आदिंसह इंदौर, मुंबई, पुणे, राजस्थानमधील बाली आदि ठिकाणांहून जैनबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. आर. गर्ग यांनी केले. (प्रतिनिधी)
आत्म्यात परमात्मा पहा
By admin | Published: July 10, 2016 9:00 PM