नाशकात प्रथमच सेनेचा भगवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM2018-05-25T00:02:24+5:302018-05-25T00:02:24+5:30
कॉँग्रेस आघाडीला पाठिंबा देणाऱ्या भाजपाची नाचक्की
नाशिक : पालघर पोटनिवडणुकीतील राजकारणाचा बदला म्हणून भाजपाने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री कॉँग्रेस आघाडीला पाठिंबा देऊन शिवसेनेला खिजविले खरे; परंतु शिवसेनेने चारही पक्षांना चारीमुंड्या चित करीत पहिल्यांदाच या मतदारसंघावर भगवा फडकविला. त्यामुळे विशेषत: भाजपाचीच नाचक्की घडून आली.
आजवर राष्टÑवादीच्या ताब्यात असलेल्या नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने शिवसेनेचे गतवेळचे पराभूत उमेदवार शिवाजी सहाणे यांना उमेदवारी दिली, तर सेनेने नरेंद्र दराडे या पूर्वाश्रमीच्या कॉँग्रेस पदाधिकाºयाला रिंगणात उतरविले होते. शिवसेनेकडे सर्वाधिक मतदारसंख्या होती, तर दुसºया क्रमांकावर असलेल्या भाजपाच्या १६७ मतांच्या भरवशावर परवेज कोकणी यांनी जिल्हा विकास आघाडीच्या वतीने नामांकन
दाखल केले. परंतु भाजपाने त्यांनाही वाºयावर सोडून राष्ट्रवादी, कॉँग्रेस व मनसे आघाडीला पाठिंबा दिला. ही ३४३ मते होत असतानाही सहाणे यांना फक्त २३२ मते मिळाली, तर शिवसेनेने स्वत:च्या २०७ मतांच्या बळावर लढत देत इतरांची मिळून तब्बल ३९९ मते मिळविली.अर्थात अखेरच्या क्षणी भाजपाने हात झटकलेले परवेज कोकणी यांनी शिवसेनेला साथ दिल्यानेही विजयाचे पारडे फिरले. या निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ तुरुंगातून सुटल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते; परंतु भुजबळांनी तटस्थता राखल्यानेच आपल्या विजयात भुजबळ यांचा वाटा असल्याची प्रतिक्रिया दराडे यांनी दिली.