लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ज्येष्ठ आणि गरजू कलाकारांची निवड करण्याची प्रक्रीयाच जिल्ह्यात प्रदीर्घ काळापासून झालेली नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठांना ही योजनाच माहिती नाही. मात्र, या नूतन वर्षात मी अधिकाधिक ज्येष्ठ गरजू कलावंतांशी संपर्क साधून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गायक-संगीतकार आणि जिल्हा वृद्ध कलावंत मानधन निवड समितीचे अध्यक्ष संजय गिते यांनी सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नियुक्त केलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच गिते यांची निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधलेल्या संवादात या समितीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या भविष्यातील कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.
प्र. ज्येष्ठ कलाकारांच्या निवडीचा निकष काय असेल ?
गिते - कोणत्याही कलेसाठी आयुष्याचा अनमोल वेळ दिलेल्या ज्येष्ठ आणि गरजू कलाकारांनाच योजनेअंतर्गत मानधन दिले जाते. त्यातही प्रामुख्याने ज्यांनी पूर्णवेळ त्या कलेसाठीच दिला असेल तसेच त्यांची सध्याची आर्थिक स्थिती बेताची असेल, अशा ज्येष्ठ कलाकारांनाच या योजनेअंतर्गत मानधन दिले जाते. मात्र, त्यात कुठेही माझ्याशी ओळख असणे हा निकष राहणार नसून प्रामाणिकपणे कलेसाठी झटलेल्या ज्येष्ठ कलाकारांचीच निवड होणार आहे.
प्र. सध्या किती ज्येष्ठ कलाकारांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ?
गिते - नाशिकमध्ये सध्या सुमारे २५० हून अधिक ज्येष्ठ कलाकारांचे प्रस्ताव आणि फाईल्स प्रलंबित आहेत. मात्र, त्याबाबत माझे अद्याप माहिती घेण्याचे काम सुरु असून त्यातून अत्यंत गरजू आणि आयुष्य खर्ची घातलेल्या कलाकारांचीच निवड होणार आहे. तसेच माझ्या नियुक्तीनंतर काही अजून प्रस्ताव येतील, त्यांचादेखील विचार केला जाईल. मानधन फार नसले तरी सामान्य ज्येष्ठ कलाकाराच्या कलेचा सन्मान आणि त्याच्याप्रती कृतज्ञता म्हणून नियमितपणे ते मानधन दिले जाते.
प्र. समितीची पहिली बैठक झाली का ? काही निर्णय झाले का ?
गिते - मागील आठवड्यातच समितीची निवड झाली असून त्यानंतर समितीमधील अधिकाऱ्यांशी केवळ प्राथमिक बोलणी झाली आहेत. तर समितीमधील अन्य सदस्यांपैकी सुनील ढगे, शाम लोंढे आणि सचिन शिंदे हे नाशिकचेच सदस्य असल्याने त्यांच्याशी संवाद झाला आहे. मात्र या नूतन महिन्यात पहिली बैठक होणार असून त्यानंतरच कामकाजाला वेग येऊ शकेल.