मालेगाव : येथील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी फार्मसी महाविद्यालयाच्या समोरील मैदानात सुमारे २५ ते ३० मयत जनावरे फेकलेले मिळून आले. राज्यात प्रथमच अपघात तसेच साथीव्यतिरिक्त एवढ्या मोठ्या प्रमाणावर मयत जनावरे मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तल केली जात असल्याच्या महापौरांच्या आरोपाला यामुळे पुष्टी मिळाली आहे. शहराच्या आझादनगर भागात असलेल्या फार्मसी औषधशास्त्र महाविद्यालयाच्या समोरील बाजूस मोठे पटांगण आहे. या पटांगणाचा उपयोग मयत जनावरे फेकण्यासाठी केला जातो. अशा या जागेतून मोठी दुर्गंधी येत असल्याने परिसरातील रहिवाशांनी या भागात पाहणी केली असता त्यांना २५ ते ३० जनावरे मयत अवस्थेत आढळून आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेलेली जनावरे पाहून काही जागरूक नागरिकांनी पवारवाडी पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता नागरिकांच्या म्हणण्यात तथ्य आढळून आले. ही जनावरे गुदमरून मेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, ती दोन ते तीन दिवसांपूर्वी मयत झाली असल्याने दुर्गंधी येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या जनावरांना ओवाडी नाला परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदून पुरण्यात आले. ही जनावरे कत्तलीसाठी शहरात आणण्यात आली होती. जनावरांची वाहतूक करताना गाडीत गुदमरून मृत्यु झाल्याने त्यांना रात्रीच्या अंधारात फेकण्यात आल्याचे समजते. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल केली जात असून, याकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याच्या येथील महापौरांच्या आरोपाला यामुळे पुष्टी मिळते. शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या वाहनांमध्ये जनावरे भरून आणली जात असताना, त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप नेहमीच करण्यात येतो. पोलीस या आरोपाचे खंडन करीत असले तरी राज्यासह इतर राज्यांतून रोज मोठ्या प्रमाणावर जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे. यातील काही जनावरे चोरी करून आणली जात असून, ही जनावरे निर्दयतेने कोंबल्याने गुदमरून मयत होतात. ही मयत जनावरे गुपचूप फेकून दिली जातात. यामुळे नेहमी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असली तरी यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. शहरात रोज सायंकाळी ते पहाटे यावेळेत नामपूर, सटाणा, कुसुंबा, दरेगाव, पवारवाडी, चंदनपुरी गेट या रस्त्यावरून जनावरांची वहातूक सुरु आहे. या प्रकारात सणाच्या काळात मोठी वाढ होेत असून, या काळात शहरातील जवळपास सर्वच रस्ते तसेच चौकात जनावरे बांधलेली असतात. या कत्तलीसाठी जनावरांची चोरी करण्यात येत असून, शेजारील जवळपास सर्व जिल्ह्यांतील पशुधनाच्या चोरीमुळे शेतकरी किंवा जनावरांचे मालक हवालदिल झाले आहेत. येथील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांत जनावरांच्या चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, यातील जवळपास सर्व आरोपी अज्ञात आहेत.
मयत जनावरे मिळून आल्याने खळबळ उडाली
By admin | Published: February 09, 2015 1:24 AM