सातपूर : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सातपूर येथील बसपास केंद्रावर धाव घेऊन बसपास सुविधा सुरळीत केली.गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरातील विद्यार्थ्यांना एसटी पास काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहूनदेखील पास मिळत नव्हते. पास मिळविण्यासाठी पालकांना कामावर सुटी टाकून दोन दोन दिवस रांगेत उभे रहावे लागत होते, तर विद्यार्थ्यांनाही पास काढण्यासाठी शाळा बुडवण्याची वेळ येत होती.विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली आशा भंदुरे, संगीता अहिरे, मीनाक्षी गायकवाड, अपेक्षा अहिरे, वंदना पाटील, सुजाता गाढवे, कांचन पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी सातपूर येथील बसपास केंद्रावर जाऊन माहिती घेतल्यानंतर विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्याशी चर्चा केली. तसेच अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत अर्धा तासाच्या आत दुसरा कर्मचारी पाठवला. त्यामुळे महिला व पुरुष अशा स्वतंत्र दोन रांगेत पास मिळायला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.सातपूर बसस्टॅण्डजवळील एकच बसपास केंद्र असल्याने परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांची या ठिकाणी गर्दी होत असते. पालक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी अशोकनगर, शिवाजीनगर, चुंचाळे या भागांतही स्वतंत्र बसपास केंद्र सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी विभाग नियंत्रक नितीन मैंद यांच्याकडे केली आहे.
सातपूर बसपास केंद्रावरील सेवा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 1:33 AM