नाशिक : शहर पोलीस दलात आता यापुढे एकही पोलीस कोरोनाचा बळी ठरणार नाही, यासाठी मुख्यालयात स्वतंत्र असे ‘कोविड केअर सेंटर’ दोन दिवसांत सुरु करणार असल्याची घोषणा नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि.७) केली. पोलीस आयुक्तालयातील शिपायापासून अधिकाऱ्यापर्यंंत सर्वांच्या मनातील कोरोनाची भीती घालविणे आणि कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यांना मानसिक-शारिरिकदृष्ट्या सक्षम करणे हाच माझा सध्यस्थितीत प्रथम ‘अजेंडा’ असल्याचे पाण्डेय यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार गेल्या शुक्रवारी (दि.४) पाण्डेय यांनी मावळते पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्याकडून स्विकारला. गेल्या तीन दिवसांत त्यांनी विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत तेथील कर्मचाऱ्यांचे प्रबोधन व करोनाविषयीच्या गैरसमजुती दूर करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सोमवारी पाण्डेय यांनी आयुक्तालयात प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रारंभी मुंबईच्या धर्तीवर कोरोनाशी लढा देण्यासाठी शहर पोलीस दलाला सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. आतापर्यंत तीन पोलीस बळी ठरले आहेत. सध्या १८ पोलीस रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत तर २३ पोलीस गृह विलगीकरणात आहेत. शहरात दररोज वाढणारी रुग्णसंख्या बघता पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण तयार होणे सहाजिकच आहे. कोरोनाचे संक्रमण पोलीस दलात रोखणे, यासाठी सर्वप्रथम शक्य तेवढ्या उपाययोजना राबविण्यावर भर देणार असल्याचे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.‘पोलीस मॅन्युअल’पेक्षा मी हुश्शार नाही!राज्याच्या गृह विभागाने ठरवून दिलेल्या ‘पोलीस मॅन्युअल’पेक्षा मी स्वत:ला हुश्शार मुळात समजत नाही. गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणारच. मी लेखी स्वरुपात निर्णय देतो, असे सांगत पाण्डेय यांनी उगाचच काहीतरी घोषणाबाजी करणे मला योग्य वाटत नाही. गुन्हेगारीचा रोग जसा असेल तसे मी ‘औषध’ देणार अशा शब्दांत त्यांनी सावध इशारा दिला.