सेतू बंद : आता सेवा केंद्रासाठीही दलाल कार्यरत हजारो दाखले स्वाक्षरीविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:32 AM2018-03-11T00:32:05+5:302018-03-11T00:32:05+5:30
नाशिक : सेतू केंद्रात नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांवर आधारित तयार असलेले सुमारे साडेपाच हजार दाखल्यांवर महसूल अधिकाºयांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सदरचे दाखले तसेच पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
नाशिक : जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून सेतू कार्यालय बंद करून सर्व प्रकारचे शासकीय दाखले आॅनलाइन देण्याचे जाहीर केल्याने तत्पूर्वी सेतू केंद्रात नागरिकांनी सादर केलेल्या अर्जांवर आधारित तयार असलेले सुमारे साडेपाच हजार दाखल्यांवर महसूल अधिकाºयांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने सदरचे दाखले तसेच पडून असल्याची बाब निदर्शनास आली आहे. प्रशासनाने त्याचा इन्कार केला असून, दुसरीकडे नागरी सेवा केंद्रांच्या दलालांचा आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुळसुळाट वाढून दाखल्यांची चौकशी करण्यासाठी येणाºया नागरिकांना गंडविण्यास सुरुवात झाली आहे. सेतू केंद्राविषयी होणाºया तक्रारी व नाशिक जिल्हा ‘डिजिटल इंडिया’त सहभागी करून घेण्याच्या अट्टाहासापोटी जिल्हा प्रशासनाने दि. ५ मार्चपासून नाशिक शहरातील पाचही सेतू केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी घरबसल्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवरून दाखल्यांसाठी अर्ज सादर करावा व घरी बसूनच दाखला घ्यावा. त्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नसल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. ज्यांच्याकडे ही सोय नसेल त्यांच्यासाठी नागरी सेवा केंद्रे व महा ई सेवा केंद्रांतून ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात ८३ केंदे्र सुरू करण्यात आल्याचेही जाहीर केले आहे. दुसरीकडे सेतू केंद्रात यापूर्वी दाखल्यांसाठी अर्ज सादर केलेल्या नागरिकांसाठीच सेतू सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. तथापि, सेतू केंद्राकडे नागरिकांनी दाखल्यांसाठी अर्ज केलेले सुमारे साडेपाच हजार दाखले सेतूने तयार करून ते सक्षम अधिकाºयांकडे स्वाक्षरीसाठी पाठविले आहेत. परंतु आता सेतू बंद झाल्याने स्वाक्षºया कसल्या, असा प्रश्न करून महसूल खात्याच्या अधिकाºयांनी या दाखल्यांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नागरिक आता सेतू केंद्राचे उंबरठे झिजवत आहेत.
ध्वनिचित्रफीत व्हायरल
प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय व ज्या ठिकाणी सेतू केंद्र होते त्याठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी सेवा केंद्राची यादी फलकावर जाहीर केली आहे. नागरिकांना सेवा केंद्राची माहिती व्हावी हा त्यामागचा हेतू असला तरी, आता या ठिकाणी सेवा केंद्राचे दलाल घिरट्या घालू लागले आहेत. दाखल्यांची विचारणा करणाºयांना व्हिजिटिंग कार्ड देतानाच दाखल्यासाठी किती शुल्क लागेल याचे दरपत्रकही नागरिकांच्या हातात ठेवू लागले असून, त्यासाठी शंभर ते पाचशे व पुढे निकड पाहून दराची आकारणी केली जात आहे. यासंदर्भात काही ध्वनिफीतही व्हायरल झाल्या आहेत.