‘चाचा’ अन् ‘कडक्या’सह सात गुंडांना केले तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:28 AM2021-02-28T04:28:37+5:302021-02-28T04:28:37+5:30
सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत कायदासुव्यवस्थेला वारंवार धोका पोहोचविणाऱ्या गुंडांविरुध्द शहर ...
सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत कायदासुव्यवस्थेला वारंवार धोका पोहोचविणाऱ्या गुंडांविरुध्द शहर पोलिसांनी मोर्चा उघडला आहे. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी परिमंडळ-१अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांमधील सराईत गुन्हेगारांचा पूर्वइतिहास तपासून सध्याची वर्तणूक लक्षात घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी गुन्हेगारांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये काही गुन्हेगारांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर म्हसरुळ व पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील चौघांना दोन वर्षे तर तिघा संशयित सराईत गुन्हेगारांना तीन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याचे तांबे यांनी सांगितले. यामध्ये सूरज ऊर्फ चाचा निवृत्ती चारोस्कर (२० रा.म्हसरुळ), गणेश बाबुराव धात्रक (२६ रा.स्वामी विवेकानंदनगर), विजय कुमार पुंडलिक गांगोडे (२३ रा.म्हसरुळ), गणेश पंढरीनाथ धोत्रे (३८ रा.एरिगेशन कॉलनी), पप्पू मंगलसिंग भोंड (३५),गणेश झुंबर आहेर (दोघे रा., कातारगल्ली, फुलेनगर) आणि सागर ऊर्फ कडक्या गणपत बोडके (२१ रा.फुलेनगर) या गुंडांचा समावेश आहे.
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशान्वये दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या व समाजात उपद्रव करणारे तसेच शहरातील वेगवेगळ्या भागात टोळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कुठलीही गय केली जाणार नसल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले आहे.