जुने नाशिकमध्ये सात तास वीजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 09:11 PM2018-03-12T21:11:57+5:302018-03-12T21:11:57+5:30
जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे
नाशिक : उन्हाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना सोमवारी (दि.१२) शहराच्या कमाल तपमानाचा पारा थेट ३६ अंशाच्या पुढे सरकला होता. त्यामुळे वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत असल्याने अंगाची काहिली होत होती, अशा स्थितीत सकाळपासून जुने नाशिक गावठाण परिसरात वीजेचा लपंडाव सुरू होता.
जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे. वीजतारा भुमीगत करण्याची जुनी मागणी कायमस्वरुपी प्रलंबित आहे. याबाबत महावितरण व महापालिका प्रशासनाची असलेली उदासिनता कमी होत नसल्याने नाराजी नागरिकांमध्ये कायम आहे; मात्र दुसरीकडे वीजपुरवठाया भागात सुरळीत केला जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपुर्वी संपुर्ण जुने नाशिकमधील वीजपुरवठा रात्री अचानकपणे बंद झाला होता. यावेळी नागरिकनी भद्रकाली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तक्रार केली होती. यावेळी दुध बाजारमधील मौला बाबा दर्गाजवळील रोहित्रामध्ये बिघाड होऊन संपुर्ण परिसरात अंधार पसरला होता. यावेळी वायर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत वीजपुरवठा सुरळीत करण्यास असमर्थता महावितरणकडून दर्शविण्यात आली होती. यावेळी कोकणीपुरा भागातील एक जागरूक नागरिकाने वाढत्या उष्म्याला कंटाळून घरामध्ये ठेवलेली वायर काढून देत कर्मचा-यांना त्वरित दुरूस्ती करण्यास सांगितले. सुमारे अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाल्याने जुने नाशिककरांना शुक्रवारची रात्र जागून काढण्याची आलेली वेळ टळली. या समस्येला दोन दिवस उलटत नाही, तोच पुन्हा सोमवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जुन्या नाशकात वीजेचा लपंडाव सुरू होता. दर पाच ते दहा मिनिटांनी वीजपुरवठा खंडीत-सुरळीत होत असल्यानेआश्चर्य व्यक्त केले जात होते. ही समस्या अर्धा तास किंवा एक तास नव्हे तर तब्बल सहा ते सात तास कायम राहिली.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी हवी
महावितरणकडून भोंगळ कारभार जुने नाशिक भागात थांबवावा आणि जुनाट वीजतारा, फ्यूज, रोहित्रांवरील जुने साहित्य बदलण्याची मागणी होत आहे. सातत्याने वीजपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्यामुळे नागरिक त्रस्त होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याबरोबर वीजेचाही वापर वाढतो. घरामधील पंखे, कुलर, फ्रिज अशा उपकरणांचा वापर सर्वाधिकरित्या नागरिकांकडून केला जातो. त्यामुळे महावितरण प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची मागणी होत आहे.