कळवण : नाशिकसह कळवण (मानूर) येथे कोरोनाचे काही संशयित सापडले, सुदैवाने त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. येत्या २ एप्रिलपासून सप्तशृंगगडावर सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवाच्या नियोजनासाठी सोमवारी (दि.१६) होत असलेल्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.चैत्रोत्सवाच्या नियोजनाबाबतची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस, आरोग्य आदी विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत कोरोनाबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. सप्तशृंगीच्या चैत्रोत्सवाबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.सप्तशृंगगडावर सद्यस्थितीत कोरोनाचे सावट दिसत नसले तरी चैत्रोत्सवावर त्याचा परिणाम होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली असून, ठिकठिकाणी माहिती फलक लावून भाविकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत फलक लावले आहेत.सप्तशृंगगडावर दर्शनासाठी भक्त व पर्यटकांची गर्दी असते.अद्यापतरी गडावरील भाविकांच्या संख्येत कुठलाही फरक पडलेला नाही.
सप्तशृंगीचा चैत्रोत्सव; आजच्या बैठकीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 1:01 AM