क्रांतिकारी निर्णयांव्दारे शाहू महाराजांनी समाजाला एकसंध करण्यास दिले प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:17 AM2021-06-09T04:17:06+5:302021-06-09T04:17:06+5:30
नाशिक : शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व ...
नाशिक : शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ. स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली, तर अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन समाजाला एकसंध करण्याला प्राधान्य दिल्याचे इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित शद्बजागर या व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू या नावाने ते प्रसिद्ध होते. ते एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली. त्यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती, असेही त्यांनी नमूद केले.
पाहुण्याचे स्वागत, प्रास्ताविक कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक कार्य सचिव प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे यांनी करून दिला. व्याख्यानमालेचे समालोचन बाल विभागप्रमुख गिरीश नातू यांनी केले. अर्थ सचिव उदयकुमार मुंगी यांनी आभार मानले.
इन्फो
बहुजनांच्या उन्नतीसाठी प्रयत्न
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले. त्यांनी सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास ‘फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र’ असे म्हणतात.
फोटो
०७मंजुश्री पवार