मीही लासलगावसारख्या ग्रामीण भागातून १९५८ साली शिक्षणासाठी पुण्यास गेलो. कॉमर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच वर्षी शरद पवार यांनीही प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये साधारणपणे शहरी व बिगरशहरी (ग्रामीण) असे साधारणपणे दोन गट होते. त्याप्रमाणे आमचाही एक गट तयार झाला. त्यात शरद पवार, कै. अभय कुलकर्णी, कुमार शेट्ये, कमलाकर मेहेत्रे इ. तसेच स्थानिक धनजी जाधव, विठ्ठल मणियार, चंदू चोरडिया, बाल अग्रवाल, पूनावाला असा आमचा ग्रुप होता.
शरद पवार त्यावेळी भांडारकर रोडवर मर्ढेकर बंगल्याच्या मागील बाजूस कमलाकर मेहेत्रे, कुमार शेट्ये यांच्यासोबत रहात. सकाळी ७.३० ते ११ कॉलेजच्या वेळा होत्या. विषयाच्या तासाला हजेरी लावण्याइतपतच वर्गात उपस्थिती असे. बहुतांश वेळ, जिमखाना, ऑफिस व जिमखाना शिक्षक खानीवाले यांच्यासोबतच जात. धिप्पाड शरीरयष्टी, वजन अंदाजे १००-१२५ किलो. कुस्तीचे जागतिक नामवंत खेळाडू. शरद पवारांचे त्यांच्यावर खास प्रेम होते. त्यांचे पीटी किंवा एनसीसी पूर्ण केल्याचा दाखला मिळाल्याशिवाय परीक्षेचा फॉर्म भरता येत नसे. ज्यांची हजेरी कमी असत, त्यावेळी शरदराव त्या सरांना त्याची शिफारस, अडचणी सांगून पूर्णत्वाचा दाखला देण्यास मदत करीत.
कॉलेजच्या वार्षिक निवडणुका जुलै, ऑगस्ट महिन्यात होत. त्यात कॉलेजचा जनरल सेक्रेटरी (विद्यार्थी) व इतर सर्व खेळांचे प्रमुख जसे की कबड्डी, क्रिकेट, बॅटमिंटन, इतर गेम यांची निवड होत. कॉलेजभोवतालच्या सर्व रस्त्यांवर पांढऱ्या चुन्याने, नावे लिहीत असत व शेवटच्या २/३ दिवसांत प्रचाराची रणधुमाळी असे. शरद पवार त्यावेळी जी.एस. म्हणून बिनविरोध निवडून आले. निवडून आलेल्या सर्वांना कॉलेजतर्फे ब्लेझरचा निळ्या रंगाचा कोट मिळत असे.
प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा एक विद्यार्थी मंडळ असावे, ही कल्पना पवारांना सुचली व त्याप्रमाणे पुण्यात प्रथमच प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची जिल्हा विद्यार्थी संघाची स्थापना झाली. त्याचा फार मोठा फायदा, साहेबांना पुढील राजकारणात झाला. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक मित्र आजही त्यांच्या संपर्कात आहेत. ते जिल्ह्यातील राजकीय व इतर घडामोडींची खात्रीलायक माहिती पाहिजे तेव्हा पवार साहेबांना देतात.
कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन हे नाताळच्या सुटीपूर्वी होत. विविध कार्यक्रमात भाग घेण्यापेक्षा कार्यक्रम पार पाडण्यात (कारण स्थानिक विद्यार्थी सहभाग जास्त असे) आमचा गट तत्पर असायचा, लाईट घालवणे, शिट्ट्या मारणे इ. स्नेहसंमेलनात विद्यार्थी एकमेकांचे सुट-टाय असा ड्रेस करून स्नेहसंमेलनात मिरवत असत.
एकदा आर्ट सर्कलमध्ये प्रा. आपटे सरांनी एका प्रसिद्ध गायकाचा शास्त्रोक्त संगीताचा कार्यक्रम ठेवला. तरुण विद्यार्थ्यांना (त्याकाळी) न रुचणारे शास्त्रोक्त गायन. मग अनेक व्यत्यय, टाळ्या, शिट्ट्यांच्या आवाजाने कार्यक्रम वेळेआधीच गुंडाळला गेला. आपटे सरांनी कपाळाला हात लावले.
बीएमसीसीची क्रिकेट टीम पुण्यातील सर्व कॉलेजमध्ये नंबर एक होती. जोडीला फक्त वाडिया कॉलेजची टीम. शेर महंमद, जव्हारवसा, सुलाखेसारखे नामवंत खेळाडू होते. शेवटची फायनल मॅच हीराबाग पटांगणावर (एसपी कॉलेजरोड) होत. आम्ही सर्व मित्र, पवारसाहेबही असत. रिकामे पत्र्याचे डबे व काठ्या वाजवून आमच्या टीमला प्रोत्साहन द्यायचो. ग्रामीण भागातील खेळ कुस्ती, कबड्डी, खो-खो या खेळात त्यांना विशेष रस होता. पुढील काळात ते या खेळाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते व अनेक मल्लांना त्यांनी सर्वप्रकारे आर्थिक मदतही केली.
पुण्यातून स. गो. बर्वे (सनदी अधिकारी) निवडणुकीला काँग्रेसतर्फे उभे होते. आम्ही श्रीनिवास पाटील व इतर मित्र, त्यांचे पोस्टर सायकलवर उभे राहून रात्री चिकटवीत असत. मग रात्री भूक लागली की श्रीनिवासच्या खोलीवर शिरा करून खात असत.
कॉलेज साधारण सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत असे. आम्ही तास बुडवून सकाळी १०.३०-११ व सायंकाळी ६ ते ८ डेक्कनवर कॅफे मद्रास (आताचे रूपाली हॉटेल) येथे कानडे क्लासच्या कंपाउंडच्या भिंतीवर एकमेकाचे माप काढणे (म्हणजे टवाळक्या करणे) हा कार्यक्रम असायचा. बुधवारची बिनाका गीतमाला रात्री ८ ते ९ अमीन सयानीचा आवाज व हिंदी गाणी न चुकता ऐकायचो.
मात्र, परीक्षेच्या आधी १ महिना सर्व जण मनापासून अभ्यास करीत. कारण, त्यावेळी खासगी क्लासेसची भानगड नव्हती. साहेबही जेमतेम पास होण्याइतपत रात्री अभ्यास करीत. विद्यार्थी दशेपासूनच संघटनशक्ती, एकमेकांना साहाय्य करण्याची भूमिका, थोडीफार राजकारणाशी जवळीक, नेतृत्व हे गुण त्यांच्यात होते व पुढे राजकारणात तर त्यांनी हॅट्ट्रिकच केली. हे सर्व असूनही बीएमसीसीच्या २५व्या वर्षी, ५० वर्षांच्या कार्यक्रमाला साहेब न विसरता हजेरी लावतात. वेळ मिळेल तेव्हा पुन्हा प्राध्यापकांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करतात.
प्रत्येक वेगवेगळ्या गावी, उद्घाटन, सभा, राजकीय भेटीगाठी हे कार्यक्रम आटोपून रात्री ९.३०-१० वाजता साहेब मित्रांसमवेत दिलखुलासपणे गप्पांचा आनंद घेतात. तेथे मात्र मित्राव्यतिरिक्त इतर कोणालाच प्रवेश नसतो. मग रात्रीचे १-१.३० केव्हा वाजतात ते कळतही नाही. सारखे त्यांना घड्याळ दाखवावे लागते. साहेबांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आम्ही महफील संपवतो.
साहेब सकाळी ७.३०-८ वाजता आंघोळ आटोपून, वर्तमानपत्र वाचीत नाश्ता उरकून पुढच्या दौऱ्यास रवाना होतात. असे हे आम्ही गेली ५० वर्षे बघत आहोत. प्रचंड ऊर्जा अथक परिश्रम, अभ्यासू वृत्ती, भविष्याचा वेध घेणाऱ्या या परमस्नेह्याला उदंड, निरामय आयुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
- शिवदास डागा (सी.ए.)
संचालक, नामको बँक