प्रचाराचा ज्वर शिगेला!

By Admin | Published: October 11, 2014 10:00 PM2014-10-11T22:00:20+5:302014-10-11T22:00:20+5:30

प्रचाराचा ज्वर शिगेला!

Shigella fever! | प्रचाराचा ज्वर शिगेला!

प्रचाराचा ज्वर शिगेला!

googlenewsNext


मतदान अवघ्या ७२ तासांवर आल्याने सर्वच पक्षीयांचा जाहीर प्रचार शिगेस पोहोचला आहे. विशेष म्हणजे, वैयक्तिक गाठीभेटी व संपर्काखेरीज यंदा जाहीर सभांचा धुरळा मोठ्या प्रमाणात उडाला. यात सर्वाधिक सभा भाजपा नेत्यांनी घेतल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात येऊ न शकलेल्या नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्यात सत्ता येणारच आहे, असे गृहीत धरून मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत धावणाऱ्या अनेकविध नेत्यांपर्यंत, अनेकांनी जिल्ह्यात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली. अर्थात, मोदींचे गुणगान व सत्तारुढांवरील टीका यावरच भाजपेयींचा भर होता. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही वणीसारख्या आदिवासी भागात सभा घेऊन आपल्या पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आदिंच्याही सभा ठिकठिकाणी झाल्या, पण त्यांचे विचारधन वेचून मतदान कुणाला करायचे याचा निर्णय घेता येण्याऐवजी संभ्रमच पडावा, अशी स्थिती आहे. याच्या- त्याच्यावर आरोप करण्याखेरीज कसले ‘व्हिजन’ म्हणून कुणीही काही सांगितल्याचे या प्रचारात आढळत नाही. शरद पवार यांनी मात्र आरोपांखेरीज काही शेतीविषयक प्रश्नांची चर्चा करीत जिल्हा पिंजल्याचे दिसून आले. पहिल्याच टप्प्यात मोदी येऊन गेल्याने त्यांचा येथील सभेत आवाज खणखणीत होता, परंतु उद्धव ठाकरे अंतिम पर्वात आल्याने त्यांची दमणूक झाल्याचे स्पष्टपणे जाणवणारे होते. मुद्दे तेच, पण जोश वा त्वेष गेलेला; अशी त्यांची अवस्था होती. स्थानिक पूररेषेसारख्या व ‘एलबीटी’च्या प्रश्नाला त्यांनी स्पर्श जरूर केला, परंतु भर होता तो भाजपाच्या समाचारावरच. ‘युती’ तुटल्याची बोच त्यांना किती सलते आहे हे उद्धवजींच्या बोलण्यातून पदोपदी प्रतीत होणारे होते. या सभेत सिन्नरचे उदय सांगळे यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. युवक कॉँग्रेस ते व्हाया राष्ट्रवादी, सेनेत आलेल्या सांगळेंमुळे सेनेला वंजारी समाजाचेही बळ लाभेल, परंतु तिकडे येवल्यात उद्धव ठाकरेंनी मैदान गाजवून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी भुजबळांसोबत जाण्याचा निर्णय घोषित करून सेनेला घरचा अहेर दिला. शिवसेनेला खरेच चांगले दिवस येऊ घातले असतील, तर अशी अवदसा कल्याणरावांना का आठवावी? प्रवाहाविरुद्धचे हे पोहणे जेव्हा घडून येते, तेव्हा घरातली आहे ती माणसे सांभाळली जात नसल्याचाच संकेत त्यातून जातो. निवडणुकीच्या काळात बेरजेचेच राजकारण करायचे असते. नांदगावात माजी आमदार पवार यांच्या बाबतीत ते जसे केले गेले, तसे येवल्यात झाले नाही. सर्वच पक्षीयांच्या सभांनंतर राज ठाकरे यांच्या सभा झाल्यात. जिल्ह्यातही काही उमेदवार उभे केले असताना त्यांनी प्राधान्य नाशकातील तीन जागांना दिले. यावरूनही खरेतर त्यांच्या पक्षाचा शहरी ‘आवाका’ लक्षात यावा. जिल्ह्यातील सर्वच सर्व जागांवर उमेदवार उभे असलेल्या ‘बसपा’च्या सर्वोच्च नेत्या बहन मायावती यांना नाशकातील शिखरेवाडीच्या मैदानावर सभा घ्यावी लागली, यावरून त्यांच्याही मर्यादा लक्षात याव्यात. एकूणच, या सर्व नेत्यांच्या प्रचारसभांनी माहौल मात्र टिपेस पोहोचल्याचे चित्र आहे.
- किरण अग्रवाल

Web Title: Shigella fever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.