नाशिक : राज्यात ऐनवेळी नाट्यमय कलाटणी मिळून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर नाशिकमध्ये शिंदे समर्थकांनी नाशिक-पुणे मार्गावर गुरुवारी (दि. ३०) फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. दुसरीकडे सेनेचे कार्यालय बंद होते, तर भाजप कार्यालयात नेहमीसारखा जल्लोष झाला नाही.
राज्यातील शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी काही जण पुढे आले होते. मात्र त्यांना पोलीस परवानगीअभावी शक्तिप्रदर्शन करता आले नाही. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार म्हणता म्हणता अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने समर्थक चांगलेच आनंदी झाले आहे. शहरातील एकनाथ शिंदे यांचे समर्थक दिगंबर नाडे तसेच दिनेश चव्हाण, नितीन बांडे, गणेश तांबे, मयूर तेजाळे, ॲड. विकास पाथरे, कमलेश भाले, सूर्यकांत भालेराव यांनी द्वारका येथे फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून निघाले नसून शिवसेनेतच असल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी शिवसेना कार्यालयात शांतता होती. शपथ ग्रहण कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना कार्यालय बंद होते, तर दुसरीकडे भाजप कार्यालयात जल्लोष अपेक्षित असताना तेथेही नेहमीचे कार्यकर्ते वगळता कोणीच उपलब्ध नव्हते.
इन्फो...
सेाशल मीडियावर मते-मतांतराचा पाऊस
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी (दि.२९) रात्रीपासूनच सोशल मीडियावर त्यांच्या पदत्यागामुळे अनेकांनी खंत व्यक्त केली. तशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थन-विरोधाच्या पोस्टही व्हायरल हेात होत्या.