नाशिक : मालेगाव हे मागील महिनाभरापासून कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनले आहे. मालेगावचा कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असताना आता येथील महापालिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणी अहवालातून समोर आले आहे. मालेगाव महापालिका, जिल्हा प्रशासनासह ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून सातत्याने मालेगावमधील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.संध्याकाळी चार वाजता जिल्हा शल्य चिकित्सकांकडून जाहीर करण्यात आलेल्या कोरोना नमुना चाचणी अहवालांपैकी ११ पॉसिटिव्ह रूग्ण समोर आले. एकूण ४० नमुन्यांचे अहवाल त्यांना प्रयोगशाळेतून प्राप्त झाले. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा आता ७४३वर जाऊन पोहचला आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.या अहवालांमध्ये मालेगाव महापालिकेतील ४९ वर्षीय व २७ वर्षीय दोन उच्चपदस्थ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मालेगावकर चांगलेच धास्तावले आहे. मालेगावमध्ये धुमाकूळ घालणा-या कोरोनाने आता थेट मालेगाव मनपामध्येच शिरकाव केला आहे. यामुळे आगामी काळात मालेगाव हॉटस्पॉट अधिक मोठे आव्हान ठरू शकणार आहे. मालेगावमधील कोरोना नियंत्रणा यावा यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरज जगदाळे हे याठिकाणी तळ ठोकून आहेत. सातत्याने नागरिकांच्या तपासण्या करण्यावर भर दिला जात आहे. दररोज कोरोना संशयित रुग्णांना शोधून उपचारार्थ दाखल केले जात आहे.दरम्यान, दुपारी मालेगावमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासोबत आढावा बैठक सुरू होती. या बैठकीला सदर उच्चपदस्थ अधिकारीही हजर होते. जेव्हा त्यांना कोरोना नमुना चाचणी अहवाल पॉसिटिव्ह आल्याचे समजले तेव्हा त्यांनी तत्काळ बैठकीतून काढता पाय घेतला.