मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:31 AM2021-09-02T04:31:39+5:302021-09-02T04:31:39+5:30
कोरोना संकटामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले तरी अद्यापही मंदिरे बंद आहेत. त्यासंदर्भात आंदोलनेही सुरू झाली आहेत. लग्न ...
कोरोना संकटामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले तरी अद्यापही मंदिरे बंद आहेत. त्यासंदर्भात आंदोलनेही सुरू झाली आहेत. लग्न सोहळे, राजकीय कार्यक्रम इतकेच नव्हे तर हॉटेल्स बारदेखील खुले झाले आहेत. पर्यटनदेखील सुरळीत होत असताना मंदिरे बंद आहेत. त्यामुळे सध्या राजकारण तापू लागले आहेत. मंदिरे खरे तर राजकारणापलीकडे असून त्यावर अनेकांची उपजीविका अवलंबून आहे. मंदिरातील कर्मचारी वर्गापासून परिसरातील दुकानदार तसेच पूजा साहित्य तसेच अन्य विक्री करणाऱ्यांपासून लाखाे लोकांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मंदिरे सुरू करण्याची मागणी भाजप-मनसे आणि अन्य हिंदुत्ववादी पक्ष करीत असले तरी केंद्र शासनानेच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असल्याने मंदिरे बंद असल्याचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सांगितले.
इन्फो...
हजारो कोटींची उलाढाल ठप्प
१ नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, सप्तशृंग देवी तसेच अन्य अनेक मोठी मंदिरे आहेत त्यावर हजाराे नागरिक अवलंबून आहेत, मंदिरे बंद असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२ अनेक मोठी मंदिरे- देवस्थान ट्रस्टमध्ये कर्मचारी काम करतात. नाशिकमधील काही संस्थांनी कर्मचारी कमी केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
इन्फो..
मंदिरांवरील निर्बंध ही केंद्र शासनाचीच सूचना- काँग्रेस
कोरोना संकट काळामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंदिरे बंद आहेत. त्यात भाजपने राजकारण करण्याची गरज नाही. कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेता कोणतेही गर्दीचे कार्यक्रम घेऊच नये, असे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले.
इन्फो..
लसीकरण झाल्यानंतरच मंदिरे उघडावी
कोरोनामुळे जीवाचा धोका पत्करायचा का याचा आधी विचार करायला हवा. मंदिरे उघडण्यापूर्वी नागरिकांचे लसीकरण झाले आहे काय, त्यासाठी लस उपलब्ध होत आहे काय, याचादेखील विचार करावा मगच त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी व्यक्त केले.
इन्फो...
आरोग्य नियमांचे पालन करून अनुमती द्यावी, भाजपचे मत
सर्व उद्योग व्यवसाय सुरळीत झाले आहेत. निर्बंध खरे तर नावालाच आहेत. मात्र मंदिरांच्याबाबतीत महाविकास आघाडीचा दुस्वास का हे कळत नाही. आरोग्य नियमांचे पालन करून निर्बंध उघडण्यास परवानगी देण्याची गरज असल्याचे मत भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले.
इन्फो...
केंद्र शासनाकडे काही तरी आकडेवारी असते त्याआधारे कोणते निर्बंध ठेवायचे आणि शिथिल करायचे याबाबत निर्णय घेतला जात असतो. त्यानुसारच केंद्र शासनाने राज्य शासनाला सूचना दिल्या आहेत, असे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.
इन्फो..
विश्वस्त म्हणतात..
हॉटेलपासून बारपर्यंत सर्व काही सुरळीत झाले आहे. मग मंदिरे सुरू करायला काय हरकत आहे? अन्य व्यवहार ज्याप्रमाणे आरोग्य नियमांचे पालन करून केले जाते, त्याप्रमाणे मंदिरे सुरू करण्यास परवानगी द्यावी.
- देवेंद्र भुतडा, सोमेश्वर महादेव मंदिर
....
केंद्र शासनाने घालून दिलेले मार्गदर्शक तत्त्व आणि नियमांच्या आधारेच मंदिरे खुली करण्यास मान्यता दिली पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच केंद्र शासनाच्या पत्राचा हवाला दिला आहे. त्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे.
- ॲड. अजय निकम, श्री काळाराम मंदिर