नाशिक : महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी स्थायी समितीच्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत सदस्यांनी विविध सूचनांचा वर्षाव केला. काही सदस्यांनी नावीन्यपूर्ण उपाययोजना सुचविल्या तर काहींनी अजब सूचना केल्या. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकीय सभेत शिवसेनेचे दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी सांगितले, महापालिकेने पुन्हा एलबीटी आकारणी सुरू करावी. ‘कपाट’चा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. त्याच्या दंडापोटी सुमारे २५० कोटी रुपये मिळू शकतात. शशिकांत जाधव यांनी वीजबचतीसाठी ग्रीन एनर्जी, सोलर सिस्टम वापरण्याची सूचना करतानाच अनधिकृत नळजोडण्या शोधण्यासाठी प्लंबर्सचीच अधिकृतपणे नेमणूक करण्याची अजब सूचना केली. महापालिकेने स्वत:चे बॉण्ड काढावेत तसेच केबल टाकणाऱ्या कंपन्यांना दरवर्षी शुल्क आकारणी करावी, असे सांगितले. राजेंद्र महाले यांनी सिडकोतील संभाजी स्टेडियममधील बंदिस्त हॉलचा वापर मंगल कार्यालय अथवा सामाजिक सभा-समारंभासाठी देण्याची सूचना केली. भागवत आरोटे यांनी भंगार बाजारातील विक्रेत्यांसह अतिक्रमणधारकांकडून फी वसुली करण्याची मागणी केली. मुशीर सय्यद यांनी जुन्या नाशिकमधील फुले मार्केट जुने झाले असल्याने ते पाडून टाकत तेथे बहुमजली व्यापारी संकुल उभारण्याची सूचना केली. गंजमाळ येथील जागेतही पालिका बाजार उभारण्याची सूचना करतानाच ट्रक टर्मिनस याठिकाणी टेक्स्टाइल्स मार्केट उभारण्याचा मुद्दा पुढे आणला. मुकेश शहाणे यांनी महापालिकेची उद्याने विकसित करत त्यातून उत्पन्न मिळविता येऊ शकेल, असे सांगितले. प्रवीण तिदमे यांनीही जाहिरात फलकांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीचे उपाय सुचविले. जगदीश पाटील यांनी बाजार फी वसुलीसाठी खासगी एजन्सी नेमण्याची सूचना केली. गोल्फ क्लब, तपोवनातील मैदानांचा वापर प्रदर्शनासाठी करता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक सदस्यांनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारचे उपाय सुचविले असले तरी आता यापैकी किती उपाय योजनांची अंमलबजावणी होते; याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
उत्पन्नवाढीसाठी सूचनांचा वर्षाव
By admin | Published: April 21, 2017 1:39 AM