नाशिक : पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे यांना उद्देशून ‘आगामी निवडणुकीत तुमच्यावर पक्ष मोठी जबाबदारी टाकणार आहे. तुम्ही सांभाळा,’ असे सांगितले होते. त्याच अनुषंगाने पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवार निश्चित करण्यासाठी जिल्हा निवड मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे यांची नियुक्ती केली आहे. लोकमतने ६ जानेवारी रोजीच यासंदर्भात ‘राष्ट्रवादीला पुन्हा आठवला श्रीराम’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून श्रीराम शेटे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी सोपविणार असल्याचे स्पष्ट केले होते. या नियुक्तीमुळे या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ११ जानेवारीला यासंदर्भात पत्र जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांना दिले आहे. त्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती तसेच निवड करण्यासाठी श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात यावी. या जिल्हा निवड मंडळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ समर्थक आमदार जयंत जाधव, प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांचाही समावेश आहे. तसेच पूर्वी दिलेल्या २० डिसेंबर २०१६ च्या पत्रात निर्देश केलेल्या इतर सदस्यांचा समावेश असलेल्या समितीचे निमंत्रक सदस्य या नात्याने काम पाहावे, असे पत्रात म्हटले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार करताना प्रभारी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असेही सुनील तटकरे यांच्या पत्रात म्हटले आहे. आगामी निवडणुका जिंकण्याच्या इराद्यानेच राष्ट्रवादी कॉँग्रेसने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून, श्रीराम शेटे यांची जिल्हा निवड मंडळावर अध्यक्षपदी निवड करून राष्ट्रवादीने त्यादृष्टीने पाऊल टाकल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या निवड मंडळ अध्यक्षपदी श्रीराम शेटे
By admin | Published: January 17, 2017 1:25 AM