नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी ३१ पैकी २४ प्रभागांमध्ये प्रत्येकी चार प्रवर्गांसाठी दोन ते तीन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन राहणार असल्याने मतदारांचा गोंधळ उडण्याची भीती राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु, इव्हीएमवरील प्रत्येक प्रवर्गासाठी बटण दाबल्यानंतर लागणारा लाल दिवा मतदान झाल्याचा सिग्नल देणार असून, चार उमेदवारांना मतदान केल्यानंतर अखेरच्या क्षणी मोठ्या बीप आवाजाने मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे. दरम्यान, यावेळी बीप आवाज आला की नाही, याबाबत मतदान केंद्रप्रमुखांना सतर्क राहून मतदारांकडून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची जबाबदारी वाढणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ३१ प्रभागांकरिता ८२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक शाखेने ४५७८ बॅलेट युनिट अर्थात इव्हीएम तयार ठेवले आहेत. प्रत्येक प्रभागातील उमेदवारांच्या संख्येनुसार, इव्हीएमची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानुसार, ३१ पैकी २४ प्रभागांमध्ये मतदान केंद्रावरील बूथवर दोन किंवा तीनच मशीन ठेवण्यात येणार आहेत. मात्र, एकाच मशीनवर दोन गटांच्या मतपत्रिका सेट केल्यास अशिक्षित तसेच ग्रामीण भागातील मतदारांचा गोंधळ उडण्याची भीती राजकीय पक्षांसह उमेदवारांनी व्यक्त केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक दीपक कपूर यांच्या समवेत झालेल्या राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती, परंतु त्याबाबत कपूर यांनी राज्य निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेण्याचे आश्वासन दिले होते.
लाल दिवा देणार मतदानाचा सिग्नल
By admin | Published: February 16, 2017 11:22 PM