रस्ता सुरक्षेसाठी विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम
By admin | Published: September 28, 2016 12:55 AM2016-09-28T00:55:00+5:302016-09-28T00:55:42+5:30
राष्ट्रीय सेवा योजना : विद्यार्थी कल्याण मंडळाचाही लाभला सहभाग
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेसाठी स्वाक्षरी मोहीम व स्वच्छ भारत मोहीम राबविली. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसर स्वच्छ करून वृक्षारोपणासाठी श्रमदानाच्या माध्यमातून खड्डेही खोदले. समाजात स्वच्छतेविषयी जनजागृती व्हावी व रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी अशोकस्तंभ परिसरात स्वत: रेखाटलेले फलक प्रदर्शित केले. तसेच वाहन चालवताना वाहतुकीचे नियमांचे पालन करणे, मोबाइलचा वापर टाळणे, हेल्मेट वापरणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, व्यसन करून वाहन न चालवणे आदि वाहतुक ीचे नियमही नागरिकांना पटवून देताना या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन म्हणून विद्यार्थ्यांनी नागरिकांची स्वाक्षरीही घेतली.
या मोहिमेत रिक्षाचालकांसह दुचाकी, चारचाकीचालक व महाविद्यालयीन युवकांनी या मोहिमेत सहभागी होत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आश्वासन स्वाक्षरी करून दिले. विद्यार्थ्यांना प्राचार्य वसंत वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. शरद काकड, प्रा. समीन शेख, प्रा. योगेश भडांगे आदिंनी रस्ता सुरक्षा जागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. (प्रतिनिधी)