महामार्गावर सन्नाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 10:57 PM2020-04-01T22:57:15+5:302020-04-01T22:57:38+5:30
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पंतप्रधानांनी देशभर संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या आठव्या दिवशीही ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प असून, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
नांदूरशिंगोटे : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी पंतप्रधानांनी देशभर संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या आठव्या दिवशीही ग्रामीण भागातील दळणवळण ठप्प असून, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे हे गाव अहमदनगर व पुणे महामार्गावर असून हजारो वाहनांची दळणवळण या दोन्हीही रस्त्याने होत असते. परंतु गेल्या आठ दिवसांपासून संचारबंदी व लॉकडाउनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग नाशिक-पुणे, नांदूरशिंगोटे-लोणी, नांदूरशिंगोटे-अकोले, नांदूरशिंगोटे-वावी, नांदूरशिंगोटे-सिन्नर, नांदूरशिंगोटे- संगमनेर, नांदूरशिंगोटे-ठाणगाव आदींसह ग्रामीण भागातील रस्ते गेल्या दहा दिवसापासून सामसूम आहे. गेल्या काही दिवसापासून रस्त्यावर अत्यावश्यक सेवा देणारी लोक तसेच वाहने दिसून आली. त्यामुळे ग्रामीण भागात शुकशुकाट असल्याने सर्वत्र शांतता पसरली आहे. राष्ट्रीय महामार्गावर बोटावर मोजण्याइतकेच वाहनांची रेलचेल दिसून येते. नांदूरशिंगोटे हे गाव दोन्ही जिल्ह्याच्या सरहद्दीवर असल्याने वावी पोलिसांनी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी तर नांदूरशिंगोटे-लोणी रस्त्यावर नांदूरशिंगोटे येथील निमोण रोडवरील उड्डाणपुलाखाली जिल्हा नाकाबंदी करण्यात आली आहे. दोन्हीही ठिकाणी पोलीस कर्मचारी यांच्यासह अन्य विभागातील व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. तहसीलदार राहुल कोताडे, सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आदींसह पंचायत समिती, आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाचे कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
ढाब्यांवर शुकशुकाट
सिन्नर ते संगमनेर तसेच नांदूरशिंगोटे ते लोणी या दोन्ही महामार्गांवर जवळपास पन्नास ते साठ ढाबे आहेत. या ढाब्यांबर विश्रांती म्हणून वाहनचालक थांबत असतात. मात्र पंतप्रधांनानी देशभर संचारबंदी लागू केली असल्याने या ढाब्यांवर सन्नाटा निर्माण झाला आहे. ढाबे बंद असल्याने तेथील हवा भरणे, टायर पंक्चर दुरु स्ती करणारे केंद्र सुरु नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.