दिंडोरी तालुक्यातील एकाच दिवसांत २२ शिवरस्ते झाले खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 09:32 PM2021-04-01T21:32:59+5:302021-04-02T01:00:06+5:30
दिंडोरी : तालुक्यात महसूल प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते व शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम राबवित एकाच दिवसात तालुक्यातील २२ शिवरस्ते खुले करुन दिले.
दिंडोरी : तालुक्यात महसूल प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शिवरस्ते व शिवाररस्ते खुले करण्याची धडक मोहीम राबवित एकाच दिवसात तालुक्यातील २२ शिवरस्ते खुले करुन दिले.
दिंडोरी तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांच्या सहाय्याने तहसीलदार पंकज पवार यांनी कालबध्द नियोजन करून मंगळवारी (दि.३०) दिंडोरी तालुक्यातील एकूण २२ गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले पाणंद, पांदणा, शेतरस्ते शिवार, शिवरस्ते मोकळे केलेले आहे.
याकरीता तहसिल कार्यालय दिंडोरीचे नायब तहसिलदार संघमित्रा बावीस्कर, अव्वल कारकुन बाहीकर, महसूल सहायक मोहन नांद्रे यांनी कालबध्द कार्यक्रम तयार केला, तालुक्यातील लोकांच्या सहभागातुन आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून घेत तालुक्यातील संबंधित गावचे नागरीक व शेतकरी यांच्या उपस्थित पंचनामा करून ताबा पावती करून सदर रस्तें ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आले आहे. सदर रस्त्यांची एकुण लांबी अंदाजे १४ कि. मी. इतकी असुन ९२१ पेक्षा जास्त शेतक-यांना लाभ झाल्याने तालुक्यातील शेतक-यांनी तसेच जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी परिश्रम घेतले आहे.
अवनखेड येथील गट नंबर ३८४ लगतचा शिवारस्ता, ४०० मीटर, धामणवाडी ते बोपेगाव २०० मीटर, बाडगीचा पाडा ते धोंडळपाडा शिवार रस्ता ७०० मीटर, मानोरी ते ढकांबे शिवरस्ता २०० मीटर, टिटवे येथील शिवरस्ता ३०० मीटर, जांबुटके, नाळेगावं, उमराळे बु. शिवरस्ता ५०० मीटर, गणेशगाव भवर मळा ते पाटचारी लगत ४०० मीटर, वारे ते करंजाळी १५०० मीटर, कोराटे येथील गट क्र. १०१ मधील रस्ता ८० मीटर, दिंडोरी ते वणारवाडी १०० मीटर, जालखेड गट नंबर ३७५ बांधावरील रस्ता १५०० मीटर, पिंगळवाडी ५०० मीटर, चंडिकापूर ७०० मीटर, अहिवंतवाडी ४५० मीटर, खोरीपाडा ते दगडपिंप्री ५०० मीटर, रवळगाव ते बेडकुळे वस्ती २०० मीटर, निगडोळ येथील ५०० मीटर, कादवा म्हाळुंगी शिवरस्ता ८०० मीटर, धाऊर येथील ७०० मीटर, वाघाड डम ते जांबुटके ३००० मीटर, पिपरखेड खंडेराव वस्ती ते पवार वस्ती २०० मीटर, नाळेगाव येथील गावठाण ते नागेश्वर वस्ती ५०० मीटर आदी २२ रस्ते खुले केल्याने शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.