अटल भूजल योजनेंतर्गत सिन्नर तालुक्याला होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:26 AM2020-12-03T04:26:04+5:302020-12-03T04:26:04+5:30

सिन्नर : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींचा अटल भूजल योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार ...

Sinnar taluka will benefit under Atal Bhujal Yojana | अटल भूजल योजनेंतर्गत सिन्नर तालुक्याला होणार फायदा

अटल भूजल योजनेंतर्गत सिन्नर तालुक्याला होणार फायदा

Next

सिन्नर : तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतींचा अटल भूजल योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार असून, भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी या योजेनतून कामे केली जाणार असल्याने सिन्नर तालुक्याची भूजलपातळी वाढीस याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्याचा लवकरच कायापालट होण्यास हातभार लागणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजलपातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी अटल भूजल योजना (राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधार प्रकल्प) केंद्रातर्फे राबविण्यात येत आहे. या योजनेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व देवळा या दोन तालुक्यांमधील ११६ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. यात सिन्नर तालुक्यातील ८७ तर देवळा तालुक्यातील ४२ गावांचा समावेश असल्याने या दोन्ही तालुक्यांतील ९ पाणलोट क्षेत्रात कृषी विभागामार्फत भूजलपातळी वाढीसाठी योजना राबविण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

भूजलासंबंधित माहिती व अहवाल जनसामान्यांकरिता खुले करण्यासाठी ७३.८३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्याची भूजलपातळी खालावल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या योजनेअंतर्गत विहिरींची भूजलपातळीची अद्ययावत माहिती ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील ज्या भागाची भूजलपातळी खोल गेलेली आहे. अशा भागात पिझोमीटर (विंधन विहीर) करण्यात येणार आहे.

याशिवाय लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडे तयार करण्याकामी ११०.७४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे त्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन या योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे. संबंधित गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्रथम जलअर्थसंकल्प तयार करण्यात येणार आहे. गावनिहाय जलसुरक्षा आराखडे तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती तसेच संबंधित गावाची लोकसंख्या, पशुधन, सिंचन विहिरी, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, पीक पद्धती आदी मार्गांनी होणारे भूजल पुनर्भरण आणि उपसा आदींबाबत माहिती गोळा केली जाणार आहे. या योजनेच्या नियोजनानुसार पहिल्या दोन वर्षातं सर्व कामे केली जाणार असून, निर्देशांकांची पूर्तता केल्यावर या निर्देशानुसार ११०.७४ कोटींचे प्रोत्साहन अर्थसाहाय प्राप्त होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

जलसंधारण, कृषी, लघु पाटबंधारे, ग्रामविकास आदी विभागांच्या सहभागातून योजनेची अंमलबजावणी होणार आहे. प्रत्येक वर्षातील कामांची आखणी करताना ‘अटल योजनेवरील’ विशेष कामांची नोंद केली जाणार आहे. यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आंतरविभागीय सुकाणू समिती नेमण्यात येणार आहे. जलसुरक्षा आराखड्यामध्ये मान्यताप्राप्त झालेल्या उपाययोजनांची, सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या किंवा नवीन केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनांची एक केंद्राभिमुख करण्यासाठी १४७.६४ कोटीची तरतूद करण्यात आल्याचेही खासदार गोडसे यांनी नमूद केले.

सिन्नर तालुक्यातील समाविष्ट गावे

आडवाडी, आगासखिंड, अटकवाडे, औंधेवाडी, बोरगाव पिंपरी, भाटवाडी, भोकानी, बोरखिंड, चंद्रपूर, चंद्रपूर (खापराळे), चोंधी, दहीवाडी, दापूर, दातली, दातली (केदापूर), दातली (शहापूर), दत्तनगर, देवपूर, धोंडबार, धोंडवीरनगर, दोडी खुर्द, डोणवडे, दुबेरे, दुशिंगापूर, फरदापूर, घोरवाड, घोटेवाडी, गोंडे, गुळवंच, हरसुले, हिवरगाव, जामगाव, करवाडी, केरुपाटीलनगर, खडांगळी, खंबाळे, खोपडी बुद्रुक, कीर्तांगळी, कीर्तांगळी (एकलहरे), कोमलवाडी, कोनांबे, कृष्णानगर, कुंडेवाडी, कुंडेवाडी, लोणारवाडी, मालधोन, मालेगाव, मालेगाव (मापारवाडी), मानेगाव, मेंदी, मुसळगाव, मुसळगाव (गुरेवाडी), नाणेगाव, निमगाव देवूपर, पांचाळे, पांढुर्ली, पोस्टे, पठारे बुद्रूक, पठारे खुर्द, पाटोळे, पाटपिंपरी, पिंपळगाव, फुटाळेवाडी, राहुरी, रामनगर, सांगवी, सदरवाडी, सावतामाळीनगर, सायले, शिवगा दारणा, शिवडे, शिवाजीनगर, श्रीरामपूर, सोमठाणे, सोनांबे, सोनारी, संदूरपूर, उजनी, वडगाव पिंगळा, वडांगळी, विधानवाडी, विंचूर दळवी, वडगाव, वारेगाव या गावांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे.

सिन्नर व देवळा तालुक्याचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत भूजलपातळी वाढीसाठी व्यवस्थापनासाठी योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ९ पाणलोट क्षेत्रातही काम होणार असून, या योजनेमुळे विकासाला हातभार लागणार आहे.

- खासदार हेमंत गोडसे, नाशिक

Web Title: Sinnar taluka will benefit under Atal Bhujal Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.