सिन्नरला जिल्हा परिषद, राज्य कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 04:54 PM2019-07-03T16:54:38+5:302019-07-03T16:55:14+5:30
सिन्नर : राज्य सरकारचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने पंचायत समिती कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी लक्षवेध दिनानिमित्त गटविकास अधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघावतीने पंचायत समितीच्या प्रवेशद्वारात दुपारी भोजनाच्या सुट्टीत निदर्शने करण्यात आली. गेल्या वर्षी तीन दिवसाच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचारी समन्वय सभेत आश्वासनांची पूर्तता शासनाकडून करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता न केल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीच्या कार्यालयाचे प्रवेशद्वारावर दुपारचे भोजनाचे सुट्टीत सर्व संवर्ग कर्मचारी यांच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, लिपीकवर्गीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद निरगुडे, विस्तार अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद बिब्बे, सदाशिव बारगळ, ग्रामसेवक संघटनेचे सचिव जालिंदर वाडगे यांनी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी विष्णू सहाणे, एस. एन. पांगारकर, रामलाल कोळमुते, आर. पी. सोनवणे, नितीन भटकवाडे, पांडुरंग सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषद कर्मचारी उपस्थित होते.