नांदूरवैद्य : लॉकडाऊन काळात शेतकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे राज्य शासनाने रोजगार व उत्पादनाचे कुठलेही नियोजन केले नसल्याने सर्वांना या काळात उपासमारीला सामोरे जावे लागले असून, या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. हे सर्व घडत असतानाच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने व्यवसाय करणारे दुकाने बंद असताना व बंदकाळात विजेचा कोणताही वापर झालेला नसताना अंदाजे मीटररीडिंग दाखवून एकत्रित तीन महिन्यांचे बिले काढून व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना वीज वितरण कंपनीने मानसिक व आर्थिकदृष्ट्या त्रास देण्याचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २९) सीटू संघटनेच्या वतीने घोटी येथील वीज वितरण कार्यालसमोर निदर्शने करण्यात आले.
लॉकडाऊन काळात आधीच आर्थिकचा सामना करावा लागल्याने त्यातच वीज वितरणने पाठवलेले वाढीव वीज देयके आल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, सदर बिले चौकशीसाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात घेऊन गेले असता येथील अधिकारी यांनी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक देत कोरोना काळात आम्ही तुमच्या कागदाला हात लावणार नाही तसेच तुमचे निवेदनदेखील घेता येणार नाही, असे उत्तर मिळाल्याचे सीटू संघटनेचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे यांनी सांगितले. यावेळी लॉकडाऊन काळातील तीन महिने व यापुढील सहा महिने वीजबिले माफ करण्याची मागणी सर्व नागरिकांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे देवीदास आडोळे यांनी केली आहे. यावेळी सदर वीजबिले माफ करण्याविषयीचे निवेदन वीज वितरण कंपनीचे अधिकारी राणे, तालुका वीज वितरण अधिकारी पाटील व घोटी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्याशी चर्चा करून देण्यात आले.